सर्वांच्या आवडीचा पावसाळा ! साहजिकच पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना भिजायला आवडते, वेध लागतात ते पिकनिक चे, चटपटीत गरमागरम चहासोबत कांदा-भजीचे.

एका बाजूला हा सुंदर पाऊस हवाहवासा वाटतो पण दुसर्‍या बाजूला पावसामुळे होणारी गैरसोय नकोशी वाटते. नानाविध आजार, वातावरणातील बदल तसेच यानुसार शरीरावर होणारा परिणाम.

परंतु आयुर्वेदात जसे आपण काय खाल्ले पाहिजे , कसे वागले पाहिजे याचे वर्णन आहे तसेच प्रत्येक ऋतुनुसार आपण कसे वागले पाहिजे याचेही वर्णन आले आहे.

आयुर्वेदातील ‘वर्षा ऋतुचर्‍या’ आपण नीट समजावून घेतली, तर आपण या काळातही आपले आरोग्य उत्तम ठेऊ शकतो व पावसाचा आनंद घेउ शकतो.

भू-बाष्पान्मेघनिस्यन्दात पाकदआम्लज्जलस्य च|

वर्षासू अग्निबले क्षीणे कुप्यती पवनदय: ||…..चरक सूत्रस्थान

आकाशातून पडणार्‍या पाण्यामुळे जमिनीतून निघणारी वाफ आणि आम्ल पाणी यामुळे अग्नीची ताकद क्षीण होते, वातादी दोष बिघडतात, विशेषता वात दोषाचा प्रकोप होतो व पित्तदोष साठण्यास सुरुवात होते.

याशिवाय शरीरशक्ती क्षीण होणे, अग्नि मंदावणे, पित्त साठणे आणि वात प्रकुपित होणे इतक्या सगळ्या गोष्टी पावसाळ्यात होत असल्याने प्रकृतीला जपणे फार आवश्यक आहे.

पावसाळ्यातील थंड हवा, हवेतील आद्रता, जमिनीतील ओलावा, कमी सूर्यप्रकाश यामुळे खूप काही लक्षणे जाणवू लागतात जसे की,

  • सर्दी-खोकला
  • ताप
  • घशाचे आजार
  • अशक्तपाणा
  • डोकेदुखी,पाठदुखी, सांधेदुखी
  • दम्याचा त्रास
  • निरुत्साह, अंगदुखी
  • पाण्यामार्फत होणारे जंतुसंसर्ग
  • उलटी-जुलाब
  • पचनाचे विकार, कावीळ
  • साथीचे रोग, आव पडणे.

उपाययोजना :

  • सगळ्यात महत्वाचे म्हणजे पाणी उकळून पिणे. आता यावर माझे काही रुग्ण लगेच सांगतात आम्ही प्युरिफायर चे पाणी पितो, पण एक महत्वाची बाब अशी की कितीही चांगला प्युरिफायर तुमच्याकडे असला तरी 15-20 मीन. पाणी उकळल्यानंतर जे अनावश्यक जंतु उकळण्याच्या प्रक्रियेने मारले जातात ते प्युरिफायर ने होत नाही.
  • पाणी उकळताना त्यात वावडिंग, सुंठ, तुळस, आले, अनंतमूळ यासारक्या जंतूंनाशक, पाचक व सुगंधी वनस्पति नक्की वापराव्यात.असे पाणी पचनास ही हलके व सुलभ असते.
  • नेहमी शिजवलेले व आपण स्वत: बनविलेले अन्न खावे, कारण बाहेरील अन्न बनवताना स्वच्छतेची काळजी घेतली असेलच असे नाही.
  • पालेभाज्या खाणे टाळावे.
  • दही, ताक आंबट पदार्थ खाणे टाळावे.
  • मांसाहार करत असाल तर पचण्यास हलके होईल असे शिजवावे आणि आवश्यक ते मसाले नक्की वापरावे.
  • फळांचा जास्तीत जास्त वापर करावा परंतु संध्याकाळी फळे व दही खाऊ नये.
  • शिळे अन्न खाऊ नये.
  • औषधी कषाय : 5-6 तुळशीची पाने + ½ इंच आल्याचा तुकडा + 1-2 काड्या गवती चहा + 3-4 लवंग सर्व एकत्र 2 कप पाण्यात उकळणे नंतर अर्धे म्हणजे 1 कप उरले की गाळून कोमट असताना पिणे. ( सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, घशामद्धे जंतुसंसर्ग यापैकी काही होऊ नये म्हणून वरील काढा घ्यावा.)

  • तसेच सितोपलादी, तालीसादी यासारखी चुर्णे मधासोबत घ्यावीत.
  • छातीमध्ये, घशामद्धे कफ वाटत असल्यास, दम लागत असल्यास गरम पाण्यामध्ये हळद घालून गुळणी करावी तसेच छातीला व पाठीला तेल लावून कोमट कापडणे, ओव्याच्या पुरचुंडी ने किवा रुईच्या पानांनी शेकल्यास साठलेला कफ मोकळा होऊन दम कमी व्हायला मदत होते.
  • गरम पाण्यामध्ये तुळस किवा निलगिरी घालून त्याची वाफ घ्यावी.
  • वात दोषाला संतुलित ठेवण्यासाठी संपूर्ण अंगाला तिळाचे तेल कोमट करून लावावे आणि दुसर्‍या दिवशी स्ंनांना करिता साबणाएवजी उटणे वापरावे.
  • गुडघे, सांधे,पाठ, कंबर दुखी असल्यास तिळाचे तेल लावूम रुईच्या, निर्गुडीच्या अथवा एरंडच्या पानांचा शेक करावा.
  • या काळात पचनशक्ती कमी असल्याने भूक असेल तेव्हाच आणि कमी प्रमाणात आहार ठेवावा.
  • तूप, गूळ, आवळ्याचा मोरंबा यासारखे पदार्थ खान्यामद्धे ठेवावे.
  • पावसाळ्यात मधुर, आंबट, खारट पदार्थ खाण्यात असावेत, मधुर रस वात आणि पित्ताचे शमन करतो, पचनास उत्तम आणि ताकदही वाढवतो.
  • चरक संहितेत पावसाळ्यात मध खाण्यास संगितले आहे, अतिरिक्ता क्लेड कमी करण्याचे काम मध करत असते. तसेच मधुर रस आणि पचनास हलका असल्याने मध गुणकारी आहे .
  • आंबट पदार्थपैकी : कोकम, लिंबू, डाळिंब, आवळा, मनुका, गोड ताक घ्यावे.
  • कुळीथचे पीठ किवा सूप घेणे उत्तम, बाजारी-ज्वारी ची मिक्स भाकरी पचनास सुलभ असल्यानेघ्यावी.
  • गाजर, परवर,कर्टोली, मेथी, शेवग्याच्या शेंगा भाज्या उष्ण वीर्य असल्याने पावसाळ्यात पचनास उत्तम आहेत
  • आले, जिरे, धने, हिंग, मोहरी, मिरे, बडीशेप, ओवा, दालचीनी, तमाल, लवंग, कडूनिंब, वेलची, केशर इ. मसाले पित्ता वाढवणार नसल्याने आहारात समविष्ट करावेत.

  • मुगाचा खिचडी भात, कढी, तांदळची उकड, ज्वारी-बाजारी भाकरी, कुळीथ, रवा, नाचणी तुपासह सेवन करावे.
  • पचनाचा विचार करता तुपाची फोडणी धने जिरे सह द्यावी.
  • पचन शक्ति वाढविण्यासाठी जेवणापूर्वी ½ इंच आले चिमूटभर मिठासह घ्यावे जेणेकरून पचनास मदत होईल.
  • पाचक पेय : एक ग्लास गोड ताक घेयुन त्यात सुंठ, जिरे, ओवा, हिंग, सेंधव, मिरे यांची चिमुट भर पूड घालून एकजीव करून दुपारच्या जेवानंतर घ्यावे.
  • दूध घेत असल्यास त्यात सुंठ घालून घ्यावे.
  • वर्षा ऋतुत वात कमी करण्यासाठी आयुर्वेदातील अभ्यंगं, नस्य, बस्ती, असे पंचकर्म नक्की करून घ्यावे. पंचकर्म हा शरीर शुद्धीचा एक चांगला उपक्रम आहे.
  • या काळात माश्या आणि डास यांचेही प्रमाण वाढते याकरिता घरामद्धे कडूलिंब, गुगुल, उद, ओवा, वेखंड, तूप, लसूण साल यांचा धूर करावा.
  • दुपारचे जेवण व्यवस्थित असावे रात्री मात्र हलके जेवणकरावे.

अशी घ्या केसांची काळजी :

पावसाळयात केसांची काळजी महत्वाची आहे. ह्या काळात दमटपणामुळे अधिक केस तुटण्याचं, गळण्याचं प्रमाणही वाढते. त्यामुळे शक्यतो स्ट्रेटनिंग, आर्यन करणे किवा एखाद जेल लावणे या गोष्टी टाळाव्यात.

केस धुण्यासाठी त्रिफळा, शिकेकई, रिठा यांचा वापर करावा, धुतल्यानंतर केस योग्य प्रकारे सुकतील याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे केसांना खोबरेल तेल अथवा आवळा तेलाने मालीश करावी जेणेकरून हानी टाळू शकते.

अशी घ्या त्वचेची काळजी :

  • नेहमी अंगाला तेल लावून आंघोळ करावी आणि साबणाएवजी उटणे वापरावे.
  • कोरफड गर, हळद मधासह किवा दुधाच्या साईसोबत लावल्यास त्वचा निखळ राहू शकते.
  • शरीराचा कोरडेपणा कमी करण्यासाठी दुधाची साय, गुलाब पाणी, कोरफड गर, ग्लिसरीन एकत्र करून वापरावे.
  • अन्यथा बदाम तेल व अक्रोड तेल मिक्स करून संपूर्ण अंगाला लावावे.

व्यायाम आणि प्राणायाम :

पावसाळ्यात रोगप्रतिकार क्षमता कमी झालेली असल्याने या दिवसात शरीराच्या अर्धा शक्ति व्यायाम करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे.

योगासने, चालणे, प्राणायाम यासारखे व्यायाम नित्य नियमित करावेत जेणेकरून शरीराची पचनशक्ती आणि रोगप्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होते.

पावसाचा आनंद घ्या ! मस्त रहा ! स्वस्थ रहा !

 

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

आला पावसाळा तब्येत सांभाळा ! एक आयुर्वेदिक दृष्टिकोन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *