आपल्या डोळयांमधून भावनाअत्यंत प्रभावीपणे व्यक्त होतात. “शब्दांच्या पलीकडले” असे भावविश्व उलगडण्याची क्षमता डोळ्यांमध्ये असते. डोळे हे सौन्दर्याचे प्रतीक व ह्या सुंदर जगाचे ज्ञान घेण्याचे अत्यंत प्रभावी इंद्रिय समजले जाते.

जसे सुंदर डोळे एखाद्या व्यक्तीच चेहरा खुलवितात, त्याचप्रमाणे पापण्या व डोळ्याखालील गालाचा भाग हे त्या सौन्दर्यास अधिक प्रभावीपणे हातभार लावतात.

परंतु काही व्यक्तींमध्ये डोळ्याखालील त्वचेवर काळी वर्तुळे येण्याची शक्यता असते. हा गंभीर स्वरूपाचा आजार नसला तरी त्याचे परिणाम गंभीर आहेत.

अश्या पद्धतीची काळी वर्तुळे आल्यास चेहऱ्यावरील सौन्दर्य लोप पावते व ती व्यक्ती निस्तेज, थकलेली व प्रौढ दिसू लागते. ह्याचा परिणाम मानसिकतेवर होऊन न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. वेळीच उपचार न केल्यास ती व्यक्ती एकटी राहू लागते व तिचे वैयक्तिक व सामाजिक संबंध बिघडून मनावरील ताण अजूनच वाढू शकतो

ह्या लेखात आपण आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत त्यामागची कारणे व प्रभावी उपचारपद्धती.

Table of Contents

डोळ्याखाली काळी वर्तुळे का येतात?

आयुर्वेदानुसार डोळे ही पित्त आणि मज्जा धातू चे आहेत असे वर्णन आहे. ज्यावेळी शरीरातील पित्त , वात यांच्या अनुषंगाने रक्त धातूची दुष्टि होऊ लागते तसे शरीरामद्धे बदल घडून विविध प्रकारचे आजार उद्भवू लागतात. आपल्या शरीरातील दोष आणि आपली प्रकृती यांचा नीट अभ्यास केल्यास आपण कशा प्रकारे वागावे आणि राहावे याची उत्तम सोय आयुर्वेदाने करून दिलेली आहे.

डोळ्याखाली येणारी काळी वर्तुळे ही वर वर्णन केल्याप्रमाणे पित्त वात आणि रक्त यांच्या दुशतीमुळे आढळून येतात व यांची चिकित्सा केल्यास यात अगदी उत्तमरीत्या परिणाम दिसून येतो.

आता ही काळी वर्तुळे कशामुळे येतात याची करणे आपण पाहुयात.

जीवनसत्त्वांचा अभाव हे कारण असते का?

डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे आपल्याला आढळून येतात, त्यापैकी काही महत्वाची कारणे:

  • धावपळीची जीवनशैली
  • चुकीची आहार-पद्धती
  • रात्रीचे जागरण
  • पित्त प्रकृती
  • मज्जा धातू विकृती
  • अपुरी झोप
  • ओज क्षय
  • पोट साफ न होणे
  • किडनी चे आजार
  • पांडू रोग
  • चहा – कॉफी इत्यादि चे अतिसेवन
  • मानसिक ताण तणाव
  • मोबाइल फोन आणि कॉम्प्युटर चा सतत वापर
  • अधिक काळ उन्हात फिरणे
  • आनुवंशिकता
  • वाढते वय
  • जीवनसत्वनचा अभाव / पोषक अन्नाचा अभाव
  • एलर्जी
  • धूम्रपान
  • जुनाट व्याधी / आजारचे स्वरूप म्हणून
  • मिठाचे अतिसेवन करणे

Laptop व mobile चा अतिवापर हे कारण असते का?

नक्कीच. सततच्या लॅपटॉप आणि मोबाइल च्या वापरामुळे तसेच सातत्याने टीव्ही मुळेही डोळ्यांवर अतिरिक्त ताण येतो, या अतिरिक्त ताणामुळे आपल्या डोळ्याखालील त्वचा पातळ होऊन तेथील वसा व मज्जा कमी झाल्याने रक्तवाहिन्या अधिक प्रमाणात दिसू लागतात आणि त्या ठिकाणी त्वचेचा रंग बदलेला दिसून येतो.

डोळ्याखालील भागात रक्त साखळल्याने काळी वर्तुळे येतात का?

हो डोळ्यामध्ये काहीही संसर्ग (Infection) असेल अथवा डोळ्याखालील भागात रक्त साखळल्याने डोळ्या भोवतालची त्वचा ही पातळ होते आणि यामुळे काळी वर्तुळे जास्त दिसून येतात अथवा याचे प्रमाण अशा व्यक्तिमद्धे जास्त दिसून येते.

कृश व्यक्तींमध्ये अशी वर्तुळे येण्याची शक्यता जास्त असते का?

हो कृश व्यक्तिमद्धे पोषक अन्नाच्या अभावामुळे आणि शरीरामद्धे असलेली प्रथिनांची कमतरता यामुळे त्वचा पातळ आणि निस्तेज होऊन काळी वर्तुळे अधिक प्रमाणात दिसून येतात.

अति मानसिक तणाव हे कारण असू शकते का?

हो नक्कीच, मानसिक ताण तणाव हे अगदी महत्वाचे कारण आढळून येते.
मानसिक ताण – तणाव म्हणजेच चिंता जे रस दुष्टिचे प्रमुख कारण आयुर्वेदात सांगितले आहे.

चिंत्यानाम च अति चिंतनात ||

आपल्या शरीरामद्धे 7 धातू आढळून येतात (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र) यापैकी शरीराचे पोषण करणारा आहार रस म्हणजे रस धातू होय. तो जर खराब पद्धतीने तयार झाला तर पुढील सर्व धातू तसेच तयार होतात. हा रसधातू, अति चिंता केल्याने दुष्ट होतो व त्यामुळे शरीरामद्धे अनेक प्रकारचे बदल दिसून येतात. त्यातील एक कारण म्हणजे अत्यंत प्रमाणात शारीरिक व मानसिक थकवा आणि त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढलेले दिसते.

चष्म्याची खालची कड सतत टोचल्याने ?

कोणत्याही प्रकारची जखम किवा डोळ्याखालील त्वचा पातळ होणे असे चष्म्याची खालची कड सतत टोचल्याने होते आणि आशा वेळी पातळ त्वचा किंवा तेथील रक्तवाहिन्या पातळ होऊन किंवा डोळ्याखाली खड्डा पडल्याने काळी वर्तुळे निर्माण होतात.

डोळ्यांखाली सूज असल्यास

डोळ्याखालील सुजेची अनेक करणे असतात त्यापैकी काही :

  • विरुद्ध अन्न (जसे की शिकरण, दूध आणि फळे)
  • जास्त प्रमाणात मीठ खाणे
  • दही, बटाटे याचा अतिप्रमाणात जेवणामध्ये वापर
  • रडल्याने
  • पुरेशी झोप न घेतल्याने
  • एलर्जी

वरील सर्व कारणामुळे डोळ्याखाली सूज येऊन यामुळे काळी वर्तुळे वाढण्याचे प्रमाण वाढते.

प्रमाणाबाहेर व क्षमतेपेक्षा जास्त शारीरिक श्रम केल्याने ?

नक्कीच, प्रमाणापेक्षा जास्त शारीरिक अथवा शारीरिक श्रम केल्याने आपल्या शरीरातील वात व पित्त दोषाचे प्रमाण वाढून वातामुळे शरीरामद्धे रुक्षता आणि पित्तामुळे कार्षन्यत्व म्हणजेच काळेपणा वाढतो. म्हणूनच याकरिता पोषक अन्न, पुरेशी विश्रांती यांची काळजी घ्यावी.

कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तींना( कफ, वात, पित्त) अशी वर्तुळे येतांची जास्त शक्यता असते?

पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. आयुर्वेदामद्धे पित्ताचा रंग हा पिवळा, लाल, काला, निळा आहे असे वर्णन आहे. पित्ताचा रक्तशी अगदी जवळचा संबंध आहे. पित्त म्हणजे शरीरातील उष्णता, ही उष्णता जेव्हा वाढण्यास लागते त्यावेळी त्वचेच्या रंगांमध्येही बदल आढळून येतात किवा त्या व्यक्तीला रक्त दुष्टिमुळे त्वचेचे आजार आढळून येतात.

डोळ्याखाली काळी वर्तुळे आल्यास त्या व्यक्तीला सर्वजण “तब्येत ठीक नाहीये का?” असे का विचारतात?

डोळ्याखाली काळी वर्तुळे येण्याची अनेक कारणे आपण वर पहिली आहेत, त्यातील काही प्रमुख कारणे ही अपुरी झोप, प्रदूषण, सकस / पोषक आहाराची कमी असल्याने जेव्हा डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण होतात त्यावेळी चेहऱ्यावरील निस्तेजता पाहून तब्येत ठीक नसल्याचे विचारले जाते.
खरेतर पोषक आहारा अभावी चेहऱ्यावरील तेज आणि त्वचेची चमक कमी होते तसेच काळी वर्तुळे, वांग, सुरकुत्या पडणे अशी लक्षणे दिसून येतात.

डोळ्यांखाली काली वर्तुळे असल्यास चेहऱ्या वरील सौन्दर्य प्रसाधनांचा वापर टाळावा का?

हो, अतिरिक्त सौन्दर्य प्रसाधने वापरणे शरीरास आणि त्वचेस हानिकारक ठरू शकतात. यामध्ये असलेली घातक रसायने शरीरातील आणि त्वचेवरील होर्मोन्स ना बिघडविण्याचे काम करतात. जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करून चेहरा स्वच्छ ठेवणे महत्वाचे ठरते.

उपचार न घेतल्यास काळ्या वर्तुळांचा आकार व रंग वाढत जातो का?

हो. वेळीच उपचार न केल्यास याचा आकार आणि रंग वाढत जाण्याची दाट शक्यता असते.
उदाहरणार्थ आपुऱ्य झोपेमुळे काळी वर्तुळे निर्माण झाली असतील आणि ही गोष्ट सतत अव्याहतपणे चालू असेल व त्याचा सोबतीने ती व्यक्ति सतत मोबाइल आणि टीव्ही यांचा अतिवापर किंवा पोषक अन्न घेत नसेल तर नक्कीच डोळ्याखालील वर्तुळामद्धे वाढ होण्याची शक्यता जास्त आहे.

काळी वर्तुळे व रक्तदाब(Blood pressure) ह्यांचा काही संबंध असतो का?

आयुर्वेदानुसार उच्च रक्तदाब हे पित्त व रक्ताशी संबंधित गोष्टी असल्याने याचा संबंध नक्कीच काळ्या वर्तुळाशी आहे. जसे जसे रक्तदाबचे प्रमाण वाढत जाणार आहे, तस तसे या वर्तुळाचे प्रमाण वाढणार आहे.
म्हणून रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे.

काळी वर्तुळे घालविण्यासाठी अंतर्गत अथवा बाह्य उपचार आवश्यक आहेत?

अभयंतर आणि बाह्य अशा दोन्ही पद्धतीचा वापर केल्यास लवकर सुधारणा होताना दिसून येते. त्यामुळे योग्य वैद्यांच्या सल्ल्याने आपण नक्कीच उपचार करावेत.

काळ्या वर्तुळांमुळे दृष्टी अथवा डोळ्यांना अपाय होऊ शकतो का?

नाही. काळ्या वर्तुळा चा डोळ्यावर अथवा दृष्टीवर कोणताही परिणाम दिसून येत नाही. यामुळे फक्त चेहऱ्यावर मात्र परिणाम दिसून येतो.

कशा मुळे वर्तुळे वाढतात?

  • मानसिक अथवा शारीरिक श्रम व थकवा
  • कोणत्याही प्रकारचे केमिकल युक्त क्रीम
  • अपुरी झोप
  • जंक फूड
  • अपोषक अन्न
  • धूम्रपान / व्यसन
  • रात्रीचे जागरण
  • मोबाइल-लॅपटॉप-टीव्ही याचा अतिरिक्त वापर
  • स्टेरॉईड औषधे
  • पित्त प्रकृती, मज्जा धातू विकृती,
  • मलावष्टमभं
  • अतिरिक्त उन्हात अथवा उष्णतेत काम करणे.

डोळ्याखालील काळी वर्तुळे पुढे येणाऱ्या एखाद्या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते का?

काळी वर्तुळे ही पोषक अन्न अभावी कीवा एखाद्या जुनाट आजाराची लक्षणे म्हणून ही दिसून येतात. आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे आनुवंशिक. काही जुनाट आजारामद्धे आणि पुढे होणाऱ्या काही आजारचे पूर्वरूप म्हणून काळी वर्तुळे दिसून येतात. जसे की उच्च रक्तदाब , किडनी संबंधित आजार, मधुमेह, थायरॉईड, सन्निपटीक ज्वर , डोळ्यांचे इन्फेक्शन किवा मायग्रेन (सततची डोके दुखी), पित्त व रक्त दुष्टि.

हे उपाय केल्यास काही उपयोग होतो का?

जास्त पाणी पिणे–

आयुर्वेदानुसार प्रकृतीनुसार खाणे, पिणे असावे असे वर्णन आहे त्यामुळे जास्त प्रमाणात पाणी पिणे हे सगळ्यांसाठी योग्य असे नाही. रुग्णाच्या वय, अवस्था, प्रकृती आणि आजारानुसार याचे प्रमाण ठरते.

तहान लागल्यास नक्की पाणी प्यावे कीवा त्याचा अवरोध करू नये हे नक्कीच सांगितले जाते.

डोळ्यांवर काकडीचे काप ठेवणे–

काकडी थंड असल्याने यामुळे डोळ्यांच्या ठिकाणी असलेले पित्त शमण्यात नक्कीच फरक पडतो यामुळे याचा वापर नक्की करावा.

काळ्या डागांवर तेल अथवा मलम लावणे–

काळ्या डागांवर तेल अथवा मलम लावणे योग्य आहे कारण काळे डाग म्हणजे वात ,पित्त आणि रक्त दुष्टि आणि या वाताला आणि पित्ताला शमन करण्यासाठी तेल अथवा मलम लावल्यास त्यातील रुक्षता आणि काळेपणा कमी होण्यास नक्कीच मदत होते.

कोणतेही तेल अथवा मलम लावताना ते काशापासून बनविले गेले आहे याची शहानिशा करून घ्यावी. अथवा योग्य वैद्यांच्या सल्ल्यानेच ती वापरावीत.

Vitamin C व E असलेले अन्न ग्रहण करणे-

Vitamin C व E असलेले अन्न पदार्थ म्हणजे सर्व प्रकारची फळे आणि पालेभाज्या जसे की, संत्र, टोमॅटो, मोसंबी, बीट , गाजर, आवळा, सूर्यफूल, बदाम, शेंगदाणे, भोपळा असे काही पदार्थ जेवणामद्धे असल्यास यातून मिळणारे पोषक घटक त्वचेचे आरोग्य ठेवण्यास नक्कीच मदत करतात.

एखादे घरी बनावता येणारे आयुर्वेदिक मलम सांगावे.

डोळ्याखालील वर्तुळासाठी आयुर्वेदामद्धे अनेक प्रकारचे उपचार क्षुद्ररोगामद्धे वर्णन केले असून त्यातील काही उपाय खालील प्रमाणे :

  • मंजिष्टा पाऊडर 1 चमचा घेऊन तिचा दूधामध्ये लेप करणे.
  • रोगण बदाम तेल दोन्ही जेवणाच्या मध्ये पोटातून 1 -1 चमचा घेणे याने उत्तमरित्या फरक पडतो.
  • हिरड्याचे चूर्ण 1 चमचा रात्री झोपताना मधासह घेणे.
  • अनंता आणि मंजिष्टा एकत्र 1 चमचा 1 कपभर गरम पाण्यात 30 मीन भिजत ठेऊन नंतर घेणे.
  • डोळ्यांवर दुधाची पट्टी ठेवणे.
  • जेवनांतर 1 गाजर रोज खाणे.
  • डोळ्याभोवती चंदन पाऊडर+ अनंत + वाळा + यष्टीमद्धू यांचा गुलाब पाण्यातून लेप करणे.
  • गर्भारपणात जर आईने अनंता पाऊडर घेतली तर होणारे अपत्याचा रंगही सुधारतो असे आयुर्वेदात वर्णन आहे.

यावरून आपणास असे समजेल की, आयुर्वेदात किती व्यापक असे विचार मांडले गेले आहेत.

एकदा उपचार करून गेलेली काळी वर्तुळे परत येऊ शकतात का?

हो.आनुवंशिकता आणि खाण्यापिण्याचे नियम न पाळल्यास नक्कीच हे पुन्हा उद्भवू शकते.

याचकरिता फक्त वरचे वर उपाय योजना न करता आपल्या जवळच्या वैद्यची भेट घेयुन आपली प्रकृती आणि दोष जाणून घेऊन यावर उपाय योजावेत.

दैनंदिन जीवनात व आहारात कोणत्या स्वरूपाची काळजी घ्यावी?

  • सकाळी लवकर उठणे व रात्री लवकर झोपणे.
  • संपूर्ण अंगाला आठवड्यातून किमान दोनदा तरी तिळाचे अथवा औषधी तेल लावावे.
  • वेळेवर जेवण करावे व आहारमध्ये भरपूर फळे, पालेभाज्या, दूध आणि दुधाचे पदार्थ यांचा समावेश असावा.
  • शिळे अन्न, बेकरीचे, अंबवलेले, मसालेदार, तेलकट, आणि बाहेरचे अन्न पदार्थ खाणे टाळावे.
  • चहा – कॉफी , अल्कोहोल यांचे सेवन टाळावे.
  • उन्हामध्ये फिरणे टाळावे अथवा आशा वेळी गॉगल्स वापरावे.
  • आठवड्यातून किमान एक वेळा नाकामद्धे तूप घालावे.
  • केमिकल युक्त सौन्दर्य प्रसाधने आणि साबण शॅम्पू याचा वापर टाळावा.
  • पुरेशी विश्रांति आणि झोप घ्यावी.
  • कोणताही मानसिक ताण – तणाव घेऊ नये.
  • ओंकार चा जप रोज 5-10 मिनिटे करावा.
  • योगासने आणि प्राणायाम यांचा नियमित अभ्यास करावा.
  • डोळ्यांचे व्यायाम करावेत.
  • टीव्ही, मोबाइल अथवा कॉम्प्युटर यांचा अतिरिक्त वापर टाळावा.
  • जवळच्या वैद्यच्या सल्ल्याने वर्षातून एकदा तरी आपल्या प्राकृतिनुसार पंचकर्म करून घ्यावे.

डोळे आपल्या शरीरातील आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालणार एक महत्वपूर्ण अवयव आहे. यांची काळजी घेतल्यास आपला देह आणि आपल्या आजूबाजूचा परिसर ही दोन्ही आपल्याला सुंदररीत्या अनुभवता येतात म्हणूनच आपल्या त्वचेची आणि डोळ्यांची काळजी घ्या.

आयुर्वेद हे आपले शास्त्र आहे जे आपल्याला स्वस्थ आणि निरोगी ठेवण्यासाठी खूप मोलाचे रत्न औषध स्वरूपानी नेहमीच आपल्याला देत आहे याचा उपयोग नक्की करून घेऊयात.

“सर्वे सुखीन : भवंतू | सर्वे संतू निरामय” ||

 

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे होतायतं? घ्या आयुर्वेदिक उपचार व व्हा काळजीमुक्त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *