Table of Contents
तू सुखकर्ता…तू दु:खहर्ता….तू बुद्धिदाता !!
संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत असणारे गणपती भाद्रपद शुद्ध चतुर्थी पासून दहा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी पर्यन्त मनामनात आणि घराघरात विधियुक्त स्थापित केले जातात. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
ॐ ग गणपतये नम: | प्रथम वक्रतुंड च ……..|| कोणत्याही मंगलप्रसंगी प्रथम गणपतीचे स्मरण आणि पूजन करतात.
प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला गणेशाची पुजा करण्याची पद्धत आहे. शुद्ध चतुर्थीला “विनायकी चतुर्थी” म्हणतात , तर वद्य चतुर्थीला “संकष्टी चतुर्थी” म्हणतात. संकष्टी जर मंगळवारी आली तर तिला “अंगारकी चतुर्थी” म्हणतात. भाद्रपदातील गणेश चतुर्थीला “महासिद्धी विनायकी चतुर्थी” म्हणतात.
या गणेश चतुर्थीला भारतातील इतर प्रांतात अनेक नावे आहेत जसे की,
- तेलगूत – पिल्लेयर चवती (पिल्लेयर म्हणजे गणपति)
- त्रिचनापल्ली येथे ‘उच्चिपिल्लेयर’ नावाचे गणपति देऊळ भव्य आणि सुंदर आहे.
- तामिळ – तुंबिकाई अलवर म्हणजे बुद्धिमान गणपति
- कानडीत – बेनकन हब्ब
गणेशोत्सव फक्त धार्मिकदृष्ट्या नव्हे तर सामाजिक दृष्ट्या ही अत्यंत महत्वाचा आहे. सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. समाजात राजकीय आणि सामाजिक जनजागृती निर्माण करून त्यांनी या उत्सवाचा उपयोग केला. या माध्यमातून त्यांनी अनेक व्याख्याने, मेळावे, समाजजागृती केली.
चक्र : त्वम मूलाधारोसि नित्यम…..| (गणपती अथर्वशीर्ष )
MULADHAAR CHAKRA |
गणेशा ही आपल्या शरीरातील मूलाधार चक्राशी संबंधित देवता आहे. मूलाधार चक्र हे माकड हाडाच्या शेवटी आणि गुदस्थानाच्या किंचित वर स्थित आहे. मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे.
- तत्व : पृथ्वी व गंध गुण
- स्थान : पाठीच्या कण्याच्या सुरुवातीला
- रंग : लाल
- मंत्र : लम
मूलाधार चक्र हे आरोग्य व सर्व कल्याणासाठी महत्वपूर्ण आहे. या चक्रमुळे मानवाला चेतनाशक्ती, बल आणि संवर्धन ही वैशिष्टे प्राप्त होतात. प्रतीकात्मक रित्या हे चक्र कमळ व चार पाकळ्या या रूपात दर्शविले जाते , ज्यामध्ये चार पाकळ्या सुप्त मनाच्या चार भावनांना सूचित करतात. या चक्राचा मंत्र ‘लम’ आहे.
गुण : स्थिरता , उत्साह, स्फूर्ति, बल, वर्ण, गुदभाग व त्याजवळील सर्व अवयव संचालित होतात.
पत्री पूजनाचे आयुर्वेद दृष्ट्या महत्व :
गणेशोत्सवाच्या दिवसात गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्त्र पटीने कार्यरत असते.
भाद्रपद म्हणजे ऑगस्ट ते सेप्टेंबर च्या महिन्यामद्धे निसर्गामध्ये अनेक वनस्पति उगवताना आपण पाहतो. महिन्याचा विचार केल्यास असे लक्षात येते की, भाद्रपद महिना सुरू होतो. सगळीकडे हिरवे – हिरवेगार वातावरण झालेले असते. अनेक प्रकारच्या वेलींनी वनस्पति सृष्टि नटलेली असते.
वातावरण उल्हसित आणि प्रकाशमय असते, कोवळी उन्हे मन प्रफुल्लित करतात. वेगवेगळ्या वनस्पतीची फुले आणि पाने आपल्याला आकर्षित करतात जणू काही ते सांगतात की, “आमचे अस्तित्व जणू गणेशाच्या सेवेसाठीच आहे आणि आम्ही या महिन्यात गणेशाच्या पूजनासाठीच उपलब्ध झालो आहोत.” म्हणूनच या वनस्पतींचा उल्लेख फक्त आयुर्वेदातच नाही तर, धर्म ग्रंथात ही आढळतो.
गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाला २१ प्रकारच्या पत्री अर्पण केल्या जातात. त्यामागे फक्त धार्मिक करणे नसून आरोग्याच्या दृष्टीने शास्त्रीय कारणेही आयुर्वेदात सांगितली आहेत.
१) मालती : “सुमुखाय नम: | मालतीपत्रं समर्पयामी” ||
बोलीभाषेत – मधूमालती
इतर नावे – चायनीज हनिसकल व रंगून क्रीपर
शास्त्रीय नाव : combretum indicum
- माधुमालती हे मधुमेहा मध्ये अतिशय उपयुक्त आहे
- आयुर्वेदातील “वसंत कुसुमाकर” या औषधात मधूमालती आहे मधुमेह साठी हे एक वस्ताद औषध म्हणून अनेक वैद्य वापरतात.
- मालतीची फुले आधी पांढरी असून नंतर सुंदर लाल होत जातात.
- मुखरोगावर पाने चघळावी
- स्त्रियांच्या अनेक आजारात जसे की, मासिक पाळीच्या तक्रारी, अंगावरून पांढरे जाणे यामध्ये फुले आणि पानांचा रस पोटात घ्यावा.
- पचनाच्या तक्रारीवर पोटात पानांचा काढा घ्यावा
- कफ विकारात फुले, पाने, लवंग आणि तुळस यांचा काढा घ्यावा गरज असल्यास काढा थंड झाल्यावर मध घालावे.
२) माका : गणाधिपाय नम: | भृंगपत्रं समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – Eclipta alba
बोलीभाषेत – माका
- माक्याची पाने केश्यवर्धक असतात हे आपणा सगळ्यांनाच माहीत आहे.
- केसांची वाढ आणि रंग या दोन्हीसाठी उपयोगी
- बुद्धीवर्धक
- अम्लपित्तावरील उत्तम औषध
- अंगावर उठणार्या गाठीवर ताज्या पानांचा रस लावल्यास त्या कमी होतात.
- आयुर्वेदिक औषधे : भृंगराज आणि महाभृंगराज तेल, सुतशेखर रस.
३) बिल्व : उमपुत्राय नम: | बिल्वपत्रं समर्पयामी !!
शास्त्रीय नाव : Aegle marmelos
बोलीभाषेत – बेल
- आतडयाच्या रोगावर अतिशय गुणकारी औषध
- जुलाब, आव पडणे, रक्त पडणे, यामधे बेलाचा मुरांबा आणि बिल्वादी चूर्ण अत्यंत उपयोगी आहे.
- वातनाशक असून दशमूळतील एक महत्वाचे औषध
- शीतपूर्वक ज्वरामध्ये बेल, दूर्वा आणि तुळस यांचा काढा अत्यंत गुणकारी काम करतो.
- याच्या फुलापासून सुगंधी तेल काढतात
- नेत्ररोग, लठठ पणा, हृदयरोग, सर्पदंश अश्या अनेक विकारात उपयुक्त.
- आयुर्वेदिक औषधे : बिल्वावलेह, बिल्वादी चूर्ण, दशमूलरिष्ट.
४) दूर्वा : गजाननाय नम: | दूर्वा पत्रं समर्पयामी ||
बोलीभाषेत – दूर्वा, हरळी, कुश
शास्त्रीय नाव – cynodont dectylon
- गणेशाला अत्यंत प्रिय असणारी वनस्पति
- अनालसुराला गिळंकृत करून गणपतीने साऱ्यांची असुरच्या त्रासातून सुटका केली , परंतु त्यामुळे गणेशाच्या अंगाची होणारी लाही कमी करण्यासाठी दुर्वांचा अभिषेक करून गणेशाला शांत करण्यात आले म्हणूनच गणपती पूजनात दुर्वांना अनन्य साधारण महत्व आहे.
- आयुर्वेदानुसार श्वेत दूर्वा ,हरित दूर्वा आणि गंडदूर्वा असे तीन प्रकार आढळून येतात.
- दूर्वा शीतल, रंग सुधारणारे, प्रजास्थापन, रक्तस्कंद न, व्रणरोपण, मुत्रजनन व कफपित्तहर आहेत.
- दूर्वा उष्णता आणि पित्त याचे शमन करणाऱ्या आहेत
- नगिणीवर दूर्वा आणि तांदूळ पाण्यामध्ये वाटून त्याचा लेप केल्यास होणारा दाह थांबतो.
- लंघवीला जळजळ हॉट असल्यास दूर्वा रस खंडीसाखरेंसह घेणे
- स्त्रियांमधील पाळीच्या सर्व तक्रारीवर अत्यंत उपयुक्त
- नाकातून रक्त येणे यावर दूर्वा रस नाकामद्धे टाकणे
- डोकेदुखी, विंचूदंश यामध्ये दुर्वांचा उपयोग करावा.
- रक्त शुद्धिकर आणि रक्त वाढी करिता दूर्वा कल्प अथवा दूर्वा स्वरस वापरावा.
आयुर्वेदिक औषध :- दूर्वाद्य घृत , दूर्वा कल्प
५) बदर : लंबोदराय नम: | बदरीपत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – बोर
शास्त्रीय नाव :- ziziphus jujuba
ziziphus jujuba – बोर |
- ह्याच्या बियांचे चूर्ण घेतल्याने भस्म्या रोग कमी होतो.
- कडू औषध घेण्यापूर्वी बोरची पाने चावली तर कडूपणा जाणवत नाही
- डोळ्याच्या विकारात, जुलाब, चक्कर येणे, अशक्तपण, तोंड येणे, दातदुखी स्वरभेद अश्या अनेक विकारात बोराचा आणि त्याच्या पानांचा उपयोग होतो
- यामध्ये भरपूर प्रमाणात क जीवनसत्व तसेच कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह असते.
- बोराच्या पानाची चटणी व तांदळाची कांजी घेतल्याने वजन कमी होते.
- पानांच्या चूर्णाने वजन कमी होते आणि पोटाचा घेर कमी होतो आणि म्हणूनच लंबोदर हे गजननांचे नाव मोठ्या पोटावरून घेतले गेले असावे
- स्त्रियांच्या गर्भाशयातील गाठी करिता याचे पान चावून खाल्यास फायदा होतो.
६) धत्तूर : हरसूनवे नम: | धत्तूरपत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – धोत्रा
शास्त्रीय नाव – datura stramonium
- धोत्रा अत्यंत विषारी असून योग्य प्रमाणात वापरल्यास उपयुक्त आहे.
- म्हणूनच हलाहल विष पिणार्या हर म्हणजे शंकर आणि सूनु म्हणजे शंकराचा पुत्र या नावाशी जोडले गेले आहे.
- आयुर्वेदातील श्वसन संस्थेवर काम करणार्या महत्वाच्या औषधापैकी एक
- याची क्रिया शरीरावर आधुनिक औषध असलेल्या Belladonna सारखी फुफुसे कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि विस्फरणासाठी होते.
- धोत्र्याचे ‘कनकासव’ दम्यावर अत्यंत उपयुक्त आणि प्रसिद्ध आहे.
- संधीवातामध्ये उपयुक्त
- सुतशेखर मात्रेत बियांचे चूर्ण असते तर त्रिभुवन किर्ति यामध्ये पानाचा रस वापरला जातो
- चुकीच्या वापराने मृत्यूही होवू शकतो.
आयुर्वेदिक औषधे : सुतशेखर रस, त्रिभुवन कीर्ती
७) तुळस : गज कर्णाय नम: | तुलसिपत्रं समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – Ocimum sanctum
- प्रत्येक घराघरात असणारी तुळस ही सर्दी-ताप-कफ अत्यंत प्रभावी औषध
- विषघ्न म्हणून ओळखली जाणारी
- त्वचविकारात तुळसीचा रस लावल्यास उत्तम गुण येतात.
- गजकर्णाचे (ringworm) मलम म्हणाले की डोळ्यासमोर येते ती तुळस
- इथे गणेशाचे नाव देखील ‘गजकर्ण’ हत्तीचे कान असे आले आहे.
८) शमीपत्र : वक्रतुंडाय नम: | शमीपत्र समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – prosopis spicigera
- शमयती रोगाण इति शमी …. म्हणजे रोगांचे शमन करते ती शमी
- शामीची पाने अत्यंत उपयुक्त आहेत.
- कच्च्या फळांची भाजी खातात.
- रक्तपितता, जुलाब यावर उपयोगी.
- स्त्रियांसाठी उपयुक्ता जसे की, शमीच्या फळाने केस जातात.
९) अपामार्ग : गुहाग्रजाय नम: | अपामार्गपत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – आघाडा
शास्त्रीय नाव – Achyranthus aspera
- स्त्रीरोगावर विशेषत: वापरले जाते
- गुहाग्रज म्हणजे गुह्य भागावर काम करणारे
- गुहाग्रज असा शिवाचा प्रथम पुत्र कार्तिकेय असाही आहे.
- स्त्रियांच्या गर्भाशय संदर्भातील व प्रजनन विषयक तक्रारीवर आघड्याचा उपयोग दिसून येतो.
- पावसाळ्यात सर्वत्र आघाडा आढळतो
- उंदीर, विंचू, सर्प दंशात उपयोगी
- गर्मी, उपदंश, गुप्ताङ्ग विकारात उपयोगी
- लंघवीचे विकार, कावीळ, रक्तिमूळव्याध यावर गुणकारी
- अपामार्ग क्षार दमा आणि कफ नाशनार्थ उपयुक्त
१०) बृहती पत्र : एकदंताय नम: | बृहतीपत्र समर्पयामी !!
बोलीभाषेत – डोरली
शास्त्रीय नाव : solanum indicum
- बृहतीपत्र म्हणजे डोरलीची पाने डोरलीसारखे रिंगणी हे कफासाठी, दात दुखीसाठी वापरले जाते आणि म्हणूनच इथे गणपतीचे ‘एकदंताय’ हे नाव वापरले आहे.
- कुत्र्याच्या विषयावर उतार म्हणून बृहती चा रस उपयोगी पडतो.
- कृमीदन्त : बियांचा धूर तोंडामद्धे घेतल्यास दातदुखी कमी होते व दात किडण्याची प्रक्रिया थांबते.
११) करवीरपत्रं : विकटाय नम: | करवीरपत्रं समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – Nerium odorum
बोलीभाषेत – कण्हेर / करवीर
- विकट असे गणेशाचे नाव इथे वापरले आहे कारण धोत्र्याप्रमाणेच ही वनस्पति विषारी आहे.
- कन्हेरीची विषबाधा झाल्यास श्वास बंद होतो, हृदयाचे काम थांबते आणि आकडे येऊन तोंड वेडेवाकडे म्हणजे विकट होते.
- आयुर्वेदातील वातविकारात उत्तम असलेल्या महाविषगर्भ तेलात कण्हेर वापरतात.
- सर्पविषात मुळाची साल 1-2 गुंज या प्रमाणात किंवा 1-2 पाने थोड्या-थोड्या अंतराने दिल्यास जोरदार उलटी होऊन विषबाधेचा प्रभाव कमी होतो. (अतिशय सावधपणे आणि वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याचा उपयोग करावा. )
१२) रुई : कपिलाय नम: | अर्कपत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – रुई
शास्त्रीय नाव – calotropis procera
- उत्तम कफनाशक औषधी
- शरीरातील विविध ग्रंथिना उत्तेजना देऊन त्यांच कार्य सुधारून पर्यायाने शरीराच्या चयापचय सुधारणारे हे औषध आहे
- उदररोग, प्लीहावृद्धी, नाळ गुदावर उत्तम काम करते
- खोकला कमी करून कफ कमी करण्यासाठी पोटातून आणि धुरी देतात
- हत्तीरोगावर अंतर्बाह्य उपचार साठी वापरतात
- संधिवातात उपयुक्त
- कर्ण रोगात पिकलेल्या पानांचा उपयोग करावा
- सुखकारक प्रसुतीसाठी उपयुक्त
- स्थानिक शेकसाठी रुईचे पान वापरले जाते. रुईच्या पानाना तेल लावून तव्यावर गरम करून छाती शेकल्यास व पाठ शेकल्यास फुफुसे स्वच्छ होतात सर्व कफ कमी करण्यास मदत होते.
- परंतु ही वनस्पति अतिशय धोकादायक आहे, वापरताना अतिशय काळजी घ्यावी जसे की, याचा चिक डोळ्यात गेल्यास हानिकारक आहे. शिवाय चिक अंगावर उतल्यास फोड येतात. तेव्हा जपून वापरणे.
१३) अर्जुन : गजदंताय नम: | अर्जुनपत्रं समर्पयामी ||
बोलीभाषेत – अर्जुन सादडा
शास्त्रीय नाव – Terminalia Arjuna
- हृदयाला अत्यंत हितकारक.
- शितवीर्य, कफ-पित्त शामक, हृद्य, हृदयउत्तेजक, रक्तसंग्राहिक, शोणितस्थापन, व्रणरोपक व संधानीय
- हाडास उपयुक्त शिवाय हाडे संधानकर व निसर्गत: अर्जुनामद्धे कॅल्शियम मुबलक प्रमाणात असल्याने याच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात.
- आणि म्हणूनच हत्तीच्या मजबूत दाताकडे निर्देश करणारे “गजदंत” हे नाव इथे वापरले आहे.
- शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी , रक्त दाबात, छोट्या -छोट्या रक्त वाहिन्या च्या वाढीसाठी अर्जुन अत्यंत लाभदायक ठरते.
- क्षत-क्षय, कास, रक्तविकार, रक्तपित्त, प्रमेह, ज्वर, व्रण ई मध्ये उपयुक्त
- अर्जुनारिष्ट हे अत्यंत प्रचलित असे आयुर्वेदातील औषध आहे जे हृदयरोग व रक्तदाबा साठी वापरले जाते.
आयुर्वेदिक औषधे – अर्जुनारिष्ट, अर्जुन चूर्ण
१४) विष्णुक्रांता: विघ्नराजाय नम: | विष्णुक्रांतापत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – शंखपुष्पि
शास्त्रीय नाव :- Evolvulus Alsinoides
- शंखपुष्पि सारक, मेध्य, बल्य, वृश्य, कषाय, दीपन.
- शंखपुष्पि मेध्य आहे
- आयुर्वेदमद्धे शंखपुष्पि ही अत्यंत प्रचलित असून मुलांची बुद्धी वाढविण्यासाठी शंखपुष्पि दिले जाते.
- मानसरोग, अपस्मार, उन्माद, अनिद्रा, भ्रम व विष या रोगावर अत्यंत उपयोगी आहे
- याचे मुळ उगाळून दिल्यास बद्धकोष्ट, गुल्म्, आनाह असे त्रास कमी होतात व शरीरातील विष बाहेर पडते
- उन्माद अवस्थेत २०-४० ml शंखपुष्पि स्वरस दिल्यास पोट साफ होऊन मदाची अवस्था पूर्ण शांत होते
- तापामुळे झोप येत नसल्यास शंखपुष्पि चा फांट द्यावा.
- प्रलाप कमी करण्यासाठीही याचा फांट वापरतात.
- याच्या पानांचे धुमपान केल्यास श्वास व जीर्णकासामद्धे फरक पडतो
- गर्भाशय- दौर्बल्य मध्ये गर्भधारणा होत नसल्यास शंखपुष्पि लाभदायक ठरते.
आयुर्वेदिक औषध : शंखपुष्पि चूर्ण व सीरप
१५) दाडीम : बटवे नाम: | दाडीमपत्रं समर्पयामी ||
शास्त्रीय नाव : punica granatum
डाळिंब
- आवळा आणि डाळिंब दोन्ही फळे आंबट असून पित्तशामक आहेत.
- आंबट गोड अशी चव असते आणि अतिशय पौष्टिक असे फळ आहे. आहारामध्ये दररोज डाळिंबाचा समावेश करावा.
- पोटाच्या आणि आतडयाच्या रोगात अत्यंत गुणकारी आहे.
- विशेषत लहान मुलाना जंत झाल्यास चपट्या कृमि (tape worms ) तर डाळिंबाच्या सालीचा काढा द्यावा.
- मुलाना होणाऱ्या जंत, जुलाब यासारख्या आजारामद्धे डाळिंबाची उपयुक्त आहे
- दडिमावलेह आणि दाडीमाष्टक चूर्ण हे उदर रोग व पंचनाच्या तक्रारीवर उपयुक्त आहे.
- रक्तवृद्धी व रक्तशुद्धिकर म्हणूनही डाळिंबाचा उपयोग आहे.
- अम्लपित्तात, ताप , तोंडाला चव नसणे अश्या वेळी डाळिंब दाण्याचा रस घ्यावा.
- पौराणिक कथेनुसार विष्णूचा वामन अवतार हा “बटू अवतार” होता आणि त्याच्या डोक्यावर डाळिंबाच्या फळाखाली जो फुलाचा छत्रीचा आकार दिसतो त्यामुळे.
- आणि गणेशाने रावणाच्या हातातील शिवाचे आत्मलिंग काढून घेण्यासाठी जे वामनरुप, बटुरुप धारण केले त्याची आठवण म्हणून इथे बटवे नम: हे गजाननाचे नाव घेतले जाते.
आयुर्वेदिक औषधे : दाडिमावलेह आणि दाडीमाष्टक चूर्ण, दाडिमाद्य घृत.
१६) देवदार : सुराग्रजाय नम: | देवदारु पत्रं समर्पयामी ||
बोलीभाषेत – देवदार
शास्त्रीय नाव – Pinus deodara
- देवदार अतिशय उष्ण वनस्पति आहे. शीतपूर्व ज्वरात काढा देतात.
- सुराग्रज म्हणजे सुर अर्थात देवांमद्धे अग्रज म्हणजे प्रथम पूजेचा मान असलेला या अर्थाने येथे देवदार असा देववृक्ष.
- जास्त तेल असलेल्या देवदाराला तेल्या देवदार म्हणतात.
- हा उगळून घेतल्याने गर्भिणी स्त्रियाना फायदा होऊन पोटातील वायु कमी होतो आणि गर्भ वाढण्यास वाव मिळतो.
- याचा काढा घेतल्याने बाळंतीणीस कोणताही रोग होत नाही आणि झाल्यास त्वरित बरा होतो.
- आयुर्वेदातील “देवदारव्यादि काढा” बाळंतीणीसाठी प्रसिद्ध आहे.
१७) मरुपत्र : भालचंद्राय नम: | मरुपत्र समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – origanum margorana
मरवा , मूरवा
- अतिशय आल्हाददायक सुगंधी वनस्पति
- मनाला मोहवून टाकणारा सुवास
- शरीराच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणाऱ्या सर्व अंतस्त्रवि ग्रंथीची राणी समजल्या जाणाऱ्या पियुषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दूसरा उपाय नाही.
- आपल्या मेंदुमद्धे thalamus -सूर्य, hypothalamus – चंद्र, pituitary – गुरु ,आणि pineal – बुध अश्या महत्वाच्या ग्रंथी आहेत.
चंद्र हा मनाचा कारक हे आपण जाणतोच त्याच न्यायाने Hypothalamus शरीरातील पाण्यावर आणि मनावर नियंत्रण ठेवते. - मनाला मरव्यामुळे आराम मिळतो आणि आपण जीवन व्यापार सुधारतो
- म्हणून इथे भालचंद्राय हे नाव घेतले आहे आणि हे नाव शंकर आणि गणपती दोघांसाठी वापरले जाते.
१८) अश्वत्थ पत्र : हेरंबाय नम: | अश्वत्थ पत्र समर्पयामी ||
बोलीभाषेत – पिंपळ
शास्त्रीय नाव – Ficus Religiosa
- वैद्यकीय आणि धार्मिक ग्रंथामध्ये याला “बोधिवृक्ष” संबोधले जाते.
- भगवान गौतम बुद्धाना याच झाडाखाली आत्मरुपाची प्राप्ती झाली किवा दर्शन झाले असे आपण म्हणू.
- पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन आस वृक्ष आहे ज्याचे संदर्भ फक्त आयुर्वेदाताच नाही तर ऋग्वेदाताही सापडतात.
- बोबडे अथवा तोतरे बोलणे याच्या सेवनाने कमी होते.
- पिंपाळची लाख सुद्धा उपयोगी आहे
- सालीच्या काढयाने जखम / व्रण धुतल्यास लवकर बरा होतो.
- मुलांच्या बुद्धिवाढीसाठी पिंपळाच्या पानाची पत्रावळ करून प्रत्येक रविवारी गरम गरम भात, आमटी व तूप जेवायला वाढले तर त्यांची बुद्धी वाढते.
- जगाचा संचालक = हेरंब आणि जगाचा संचालक म्हणजे गणपती म्हणून हेरंब ही उपमा
- हे जगत, या संसार वृक्षाला उलट्या अश्वत्थची उपमा दिलेली आहे. उलट्या अश्वत्थप्रमाणे हे जगत पसरलेले आहे.
१९) जातीपत्रं : चतुर्भुजाय नम: | जातीपत्र समर्पयामी ||
शास्त्रीय नाव – Jasminum oriculatum
- फुलांपासून सुगंधी तेल काढले जाते
- दंतमंजन म्हणून जाईच्या कोवळ्या फांद्या वापरल्या जातात
- व्रणरोपक म्हणून काम करते, एखादी न बरी होणारी जखम जाईच्या पानाच्या काढ्याने धुवून त्यावर ठेचलेली पाने बांधल्यास हटकून गुण येतो.
- तोंड आल्यास बराच वेळ पाला चघळून थुंकून टाकावा
- यापासून बनवलेले जात्यादी तेल कानात घातले असतं कानदुखी थांबते तसेच व्रणरोपक म्हणून काम करते
- गजकर्ण, नायटा आणि खरूज यावर तेलामुळे उत्तम गुण मिळतात.
आयुर्वेदिक औषध :- जात्यादी तेल, जात्यादी घृत, जाती चूर्ण
२०) केतकीपत्रं : विनायकाय नम: | केतकीपत्रं समर्पयामी ||
केवडा
शास्त्रीय नाव – pendenus odorifer
- सुगंधी द्रव्यातील एक
- केवड्याच्या रसाचे सिद्ध तूप सेवन केल्यास मूत्रविकार कमी होतात.
- मेंदूविकारात केवडा औषधात वापरला जातो
- दीर्घकालीन डोकेदुखी आणि इतर शिरोरोगामद्धे केवड्याचा लेप लावला जातो
- सुगंधी असल्याने पान मसाला अथवा मिठाई वगेरे ठिकाणी वापरला जातो
- विनायक म्हणजे विरुद्ध नायक, ज्याचा मेंदू सतत जागृत आणि तेजतरार हवा म्हणून इथे विनायक हे गणपतीचे नाव वापरले आहे.
२१) अगस्ति – “सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामी” ||
बोली भाषेत हादगा, अगस्त्य
शास्त्रीय नाव – sesbania grandiflors
AGASTI |
- आगस्त्यांच्या फुलांची भाजी खातात. प्राचीन ग्रंथामध्ये आगस्तीचे अनेक प्रयोग सापडतात.
- मूल जन्मल्या नंतर कधी कधी त्याच्या घशात कफ एखाद्या दोरखंडप्रमाणे अडकतो त्यावर मधातून अगस्त्यच्या पानांचा 4 थेंब रस चाटवल्यास कफ कमी होतो.
- नेत्रविकारात अगस्त्य अत्यंत महत्वाचे काम करते, यामध्ये ‘अ’ जीवनसत्व वानस्पतीज रूप अर्थात बीटा-केरोटीन 45000 युजी एवढ्या प्रमाणात म्हणजे गाजरापेक्षा अधिकतर प्रमाणात सापडते.
- हिवतापात नाकात पानांचा रस ओढल्याने ताप कमी येतो. याच्या वापराने अर्धशिशी (मायग्रेन) च त्रास कमी होतो.
संधिवात आणि अपस्मारात लाभदायक. - म्हणूनच जर आपले डोळे आणि मेंदू उत्तम असेल तर हे जग उत्तमपणे जनता येणे शक्य ….म्हणून सर्वेश्वर !!
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |