Table of Contents
“वसंत ऋतुतील वमन म्हणजे निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली” ||
पंचकर्म चिकित्सा पद्धतीला आयुर्वेद शास्त्रामध्ये वैशिष्ट पूर्ण महत्व आहे. वारंवार होणाऱ्या जुनाट आजारांमध्ये औषधाबरोबर, पंचकर्म चिकीत्सेमुळे पटकन व अगदी खात्रीने उत्तम फायदा मिळतो. पंचकर्माचे मुख्य उद्दिष्ट शरीराची शुद्धी करणारी प्रक्रिया होय व याचा फायदा स्वस्थ असलेल्या व्यक्तीमध्ये भविष्यात होणाऱ्या रोगांचा अटकाव करण्यासाठी होतो. आजाराला / रोगाला मूळापासून घालविण्याचे काम पंचकर्म करते.
“ ये तु संशोधने: शुद्धा: न तेष पुनरउद्भव:” | (चरक सु.16)
संशोधनामुळे शोधन केलेले रोग पुनः उद्भवत नाहीत. शोधन म्हणजे पंचकर्म. पंचकर्मा मुळे शरीराबाहेर दोष घालविण्यास मदत होते व ते पुनः उद्भवत नाहीत.
ज्याप्रमाणे एखादा वृक्ष नष्ट करण्यासाठी त्याला मुळासकट उपटणे गरजेचे असते फक्त फांद्या तोडून उपयोग होत नाही त्याचप्रमाणे शरीरातील व्याधी पूर्णतः दूर करण्यासाठी शोधन म्हणजे पंचकर्म करणे गरजेचे असते म्हणजे दोष शरीरात पुनः उद्भवत नाहीत आणि आजार पूर्णतः नष्ट होतो.
पंचकर्म पैकी सर्वात पहिले आणि कफ विकारावर उपयोगी असणारे कर्म म्हणजे वमन. अगदी सोप्या बोलीभाषेत सांगायचे तर वमन म्हणजे “उलटी” (Drug Induce – Vomiting) करविणे, म्हणजेच शरीराच्या वरच्या (ऊर्ध्व) भागात असलेले दोष तोंडावाटे बाहेर काढणे. वमन म्हणजे औषधी चाटण व काढय़ाच्या मदतीने उलटी करविणे. आयुर्वेदानुसार वमन हे कफ प्रधान व्याधीसाठी केले जाते. कफ हा प्रामुख्याने आमाशय स्थित आहे.
“ तत्र दोषहरणम ऊर्ध्व भागं वमनसंज्ञकम.. .”|(चरक कल्पस्थान1)
शरीराच्या ऊर्ध्वभागातून म्हणजे मुखातून दोष निरहरण करणे यालाच वमन असे म्हणतात.
आमाशय म्हणजे जठर (अन्नमार्ग) जे आयुर्वेदानुसार कफाचे स्थान आहे. अन्नमार्गातील कफ घालवून स्वच्छ, रिकामा करणे हे वमन क्रियेचे उद्दिष्ट आहे. अशी स्वच्छता वेळोवेळी न केल्यास अन्नमार्गात कुजण्याची क्रिया सुरू होते, त्यातून निर्माण होणारे विषारी पदार्थ निरनिराळे आजार उत्पन्न करतात. आयुर्वेद शास्त्र हे मनुष्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यन्त कसे राहावे, कोणती काळजी घ्यावी, जेणेकरून कोणताही आजार उत्पन्न होणार नाही. शरीर पूर्णत: निरोगी राहील तसेच उच्च दर्जाचे जीवनमान कसे राखता येईल याबद्दल मार्गदर्शन करते. तसेच जर कोणता आजार निर्माण झालाच तर त्यातून लवकरात लवकर कसे बरे होता येईल, याबद्दल मार्गदर्शन करणारे शास्त्र आहे.
सर्वप्रथम कफ दोष शरीरात कसा वाढतो हे आपण पाहू.
आपण रोज जो आहार घेतो,त्या आहारात वेगवेगळे पदार्थ असतात, त्यांच्या गुणधर्मानुसार शरीरात दोष वाढतात.
उदा.
- दूध, दुधाचे पदार्थ, दही, केळी इ. पदार्थ शरीरामधे कफ वाढवितात.
- आंबवलेले पदार्थ जसे इडली, डोसा, मसाल्याचे पदार्थ, पापड, लोणचे, कुरकुरे, वेफर्स व खारवलेले आणि तळलेले पदार्थ शरीरामद्धे पित्त दोष वाढवितात.
- वांगे, बटाटा, हरभरा, मटार इ पदार्थ वात दोष वाढवितात.
वमन कोणत्या विशिष्ट ऋतुत करावे का?
वसंत ऋतु मधे वमन करावे परंतु आजारानुसार वैदयाच्या योग्य सल्ल्यानुसार वमन करविले जाते. शिशिर ऋतुतील संचित कफाचे वसंतातील उष्णतेने विलयन होऊन कफ दोष शरीरातून बाहेर काढण्यासाठी वमन चिकित्सा केली जाते.
एक उदाहरण घेऊन समजून घेऊ जसे, आपण आइसक्रीम जर उन्हात धरले तर ते लगेच वितळते तसेच, वसंत ऋतुत शरीरात जमा झालेला कफ सूर्याच्या उष्णतेने पातळ होतो आणि तो औषधी युक्त वमन देऊन बाहेर काढला जातो.
वसंत ऋतु म्हणजे मार्च ते मे दरम्यान चे महीने या काळात वमन हे पंचकर्म शरीर शुद्धी साठी करावे.
वमना साठी योग्य व्यक्ति कोण?
लहान मुलापासून अगदी वृद्ध व्यक्ति पर्यन्त सर्व कफ प्रधान व्यक्तिना वमन करता येते.
- कफाचा आजार, जुनाट सर्दी, खोकला, धुळीची ॲलर्जी
- टॉन्सिल वाढणे
- अस्थमा / दमा, श्वासावरोध
- ज्वर (ताप)
- शरीराच्या खालच्या मार्गाने रक्त जाणे.
- अपचन, आम्लपित्त, पित्ताचे आजार
- जुलाब होणे, अत्यंत पातळ मलप्रवृत्ती वारंवार होणे
- त्वचेचे विकार- सोरायसिस, इसब, पांढरे कोड, सतत अंगाला खाज येणे त्वचेची आग होणे
- शितपित्त, अंगावर गांधी उठणे, खाज येणे.
- स्त्रियांचे विकार, मासिक पाळीत अंगावरून अधिक जाणे, वंध्यत्व व गर्भसंस्कार, स्त्री व पुरुष बीज शुद्धीसाठी वमन अत्यंत फायदेशीर आहे
- स्त्री पुरुष वंध्यत्व
- शरीरात आलेले जडत्व व थकवा जाण्यासाठी
- वजन वाढवणे, वजन कमी करणे.
- अंगावर अथवा पायावर सूज येणे
- मानसिक ताण- तणाव, नैराश्य. (schizophrenia)
- डोकेदुखी, मायग्रेन
- थायरॉईड, गॉइटर, कोणतीही गाठ होणे किवा फायब्रॉईड होणे
- मधुमेह व सर्व जुनाट आजार
- अनेमिया, पांडू
- रक्तपित्त, अति रक्तस्त्राव
- लहान मुलांमध्ये अतिशय उपयुक्त
- हत्तीरोग (Elephantitis, Filariasis)
वमन कोणास देऊ नये ?
- गर्भिणी, सूतिका.
- रुक्ष प्रकृती व वात प्रकृती
- अत्यंत श्रमीत, भार वाहून नेणारे
- जन्मजात बालक, वृद्ध व्यक्ति
- नेत्रस्त्राव, नाकातून रक्त वाहणे, अंधत्व
- उदर (पोटात पाणी साठणे ), पोटाचे विकार जसे, intestinal obstruction, हर्निया,
- चक्कर येणे, प्रोस्टेट चे आजार
- मूळव्याध
वमन चिकीत्से दरम्यान किती वेग येणे योग्य आहे?
वमन वेगाच्या ३ अवस्था असतात.
- हीन योग – ०४ वेग
- मध्यम – ०६ वेग
- अतियोग – जास्तीत जास्त ८ वेग
वमन कसे करावे ?
वमन मुख्यत: तीन विभागात केले जाते.
१) पूर्वकर्म (pre – procedure) :- पूर्वकर्म करण्यापूर्वी वमनासाठी योग्य रुग्ण परीक्षा केली जाते. शास्त्रात त्यासाठी काही नियम दिले आहेत.
त्यानुसार रुग्ण वमनार्ह (वमनास योग्य) आहे का हे ठरवले जाते.
पूर्वकर्म सुरू करण्यापूर्वी काही विशिष्ट औषधी देऊन शरीरात साठलेल्या आमाचे पाचन केले जाते किवा रुग्णास लंघन दिले जाते. त्यानंतर रुग्णाची प्रकृती किवा त्यांचा आजारनुसार स्नेहपान ठरवले जाते. साधारण तीन, पाच किवा सात दिवसापर्यंत स्नेहन केले जाते. त्याची मात्रा रुग्ण प्रकृतीनुसार ठरते. साधारण ती ५०० ml ते ८०० ml औषधीय घृत या कालावधीत दिले जाते. या सात दिवासात संपूर्ण शरीराची मालीश केली जाते. तसेच सर्वांगास औषधीय काढयाची वाफ दिली जाते म्हणजे शरीरास यातून व बाहेरून सर्वत्र स्नेहाने लिप्त केले जाते. इथे स्नेह म्हणजे तेल अथवा तूप अभिप्रेत आहे. यामुळे शरीरात मृदुता येते.
शरीरातील दोष स्निग्ध व मृदु होतात. स्नेहनाने सर्व दोष कोष्टात येण्यास मदत होते. तसेच यादरम्यान खाण्याचे पथ्य पाळणे गरजेचे आहे.
श्रीखंड, दही, दूध, फळे, थंड पदार्थ , आइसक्रीम, दहीभात असे पदार्थ मनसोक्त खायला सांगितले जातात.
ज्या लहान मुलाना वमन द्यायचे आहे त्यांना वरील पदार्थ मनसोक्त देऊन वमन करविले जाते.
२)प्रधान कर्म (main procedure) :– वमन ही एक सहज सोपी प्रक्रिया आहे. योग्य वैदयाच्या देखरेखीखाली केल्यास अतिशय उत्तम गुण ह्याने मिळतात. सकाळची वेळ ही कफाची असल्याने सकाळी म्हणजे पहाटे वमन करवून घेतले जाते. अगदी सहजतेने उलटीद्वारे दोष शरीराच्या बाहेर काढण्यासाठी रूग्णास काही विशिष्ट औषधी दिली जातात.
त्या काळात रुग्णास ज्येष्ठमधाचा काढा, उसाचा रस, दूध किंवा सैंधवयुक्त पाणी असे द्रवपदार्थ उलटी करवून घेण्यासाठी वापरले जातात.
साधारणत: ४ – ६ किवा ८ वमन वेग काळात रुग्णास या उलटीद्वारे प्रथम कफदोषाचे निरहरण होते. त्यानंतर पित्त आणि वात दोष निघतो. शरीरातील सर्व घाण बाहेर निघते व शरीरातील सर्व स्त्रोतसे मोकळी होतात. लहान मुलांपासून वृद्धा पर्यन्त कोणालाही वमन देता येते.
३)पश्चात कर्म (after procedure) :– वमन झाल्यानंतर काही दिवस म्हणजे साधारण तीन ते सात दिवस काही पथ्य पालन करावे लागते. यास संसर्जन क्रम असे म्हणतात. वमना मुळे जठरावर ताण आलेला असतो, जठराग्नि मंद होतो, तो हळूहळू प्रदीप्त करण्यासाठी पचावयास हलक्या आहाराची योजना केली जाते. नंतर पूर्वीसारखा आहार सुरू केला जातो.
विशेषता ४ ते ८ उलट्या झाल्यानंतरही रुग्णास कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत नाही. अशक्तपणा जाणवत नाही. डिहायड्रेशन, हायपोटेशन होत नाही.
घृतपान म्हणजे काय ?
औषधीयुक्त तूप रुग्णाच्या आजार आणि प्रकृतीनुसार दिले जाते. एका विशिष्ट क्रमाने सकाळी आणि संध्याकाळी तूप घेणे व त्यासह योग्य आहार घेणे.
पोटातून औषधी तूप घेतल्याने शरीराला आतून आणि बाहेरून मृदुता येते. पचन क्रिया सुधारते, पोट साफ होण्यास मदत होते. जठराग्नि सुधारतो.
वमनासाठी योग्य काळ कोणता ?
वसंत ऋतु मध्ये कफ दोष वाढलेला असल्याने या काळात वमन ही चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते. साधारण फेब्रुवारी – एप्रिल या काळात वमन करता येते. या काळात शरीरात साठलेला कफ सूर्याच्या किरणांमुळे पातळ होतो, आणि वमनाद्वारे या कफाला बाहेर काढता येते.
कोणत्या वेळी वमन करू नये?
ढग आलेले असताना, पाऊस पडत असताना, घृतपानानंतर जुलाब सुरू झाल्यास, घृतपान योग्य न झाल्यास, रुग्ण वमनास योग्य नसल्यास.
लहान मुलांना वमन करता येते का?
लहान मुले ही कफप्रधान असून त्यांना सतत कृमि, सर्दी, ताप अथवा खोकला असल्याने त्यांना वमन केल्यास त्यांची रोगप्रतिकारशक्ति वाढून कफ कमी होण्यास मदत होते.
योग्य वमनाची लक्षणे कोणती ?
क्रमात कफ: पित्तमथानिलश्च् यस्य इति सम्यक वामित: स इष्ट |
दौर्बल्य लाघव ग्लानि व्याधी नामणूता रुचि: ||…
- शरीरामद्धे लाघवता, हलकेपणा, मृदुता येणे
- थकवा जाणवणे
- हृदय शुद्धी व बुद्धी इंद्रिय शुद्धी आणि लाघवता
- योग्य वेळी भूक व तहान लागणे.
शस्त्रकर्मा आधी व नंतर जशी रुग्णाची काळजी घ्यावी लागते, तसेच पंचकर्म पूर्वी व नंतर शरीराची निगराणी करावी लागते.
वमन उपचार घेतल्यास अनुवांशिक आजार व दोष दूर होतात का?
आनुवंशिक आजार दूर करण्यासाठी आयुर्वेद योग्य आहार, विहार, दिनचर्या, रात्रीचर्या आणि ऋतुचर्या यांचे पालन करण्यास सांगते.
आनुवंशिक आजार कमी करण्यासाठी आपण आपली जीवनशैली बदलणे जरुरीचे ठरते. एकच एक प्रकारचे जेवण बनविण्याची आणि खाण्याची पद्धत बदलली पाहिजे आजकल तर अनेक प्रकारचे बेकरीचे पदार्थ, प्रीझरवेटीव पदार्थ, फ्रीज मधील अन्न, विरुद्ध अन्न घेतले जाते. या सर्व प्रकारच्या अन्नाचा परिणाम शरीरावर दिसून येतो.
आनुवंशिक आजारामद्धे genes व chromosomes मध्ये जे mutation variation येतात ते आयुर्वेदनुसार काळ (time), खाण्या-पिण्याच्या सवयी, प्रदूषण, मानसिक ताण तणाव आणि घेतली जाणारी औषधे या सगळ्याच परिणाम असतो. त्यातल्या त्यात खाण्याच्या सवयी जर बदलल्या गेल्या तर नक्की आजारामद्धे फरक पडतो.
पंचकर्म म्हणजे शरीरशुद्धी याच्या उपयोगाने शरीरात नंतर कोणतेही औषध अन्न हे अत्यंत चांगल्या प्रकारे शरीरास लागू पडते म्हणून वमनासारखे पंचकर्म करून आहार विहार यामध्ये बदल केल्यास आनुवंशिक आजार नक्कीच दूर होऊ शकतात.
वमन करण्यासाठी जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे का?
३ वर्षापासून ते ६० वर्षापर्यन्त च्या व्यक्तीना वमन देता येते. कफ प्रधान दोष शरीरात असल्यास संपूर्ण प्रकृत्ति आणि दोष परीक्षण करून वमन दिल्यास अनेक फायदे दिसून येतात.
वमन चिकित्सेचे काही side effects आहेत का?
योग्य प्रकारे वमन झाल्यास कोणताही साइड इफेक्ट दिसून येत नाही. परंतु व्यवस्थित घृतपान न झाल्यास अथवा वमन योग्य पद्धतीने न झाल्यास, किवा वमना नंतर योग्य पथ्य न पाळल्यास याचे काही उलट परिणाम दिसून येतात.
वमन ही स्वयंसिद्ध चिकित्सा आहे, का तिच्या जोडीला इतर कोणती पंचकर्म चिकीत्सा वापरावी लागते?
वमना सह इतर पंचकर्म चिकित्सा जसे विरेचन केल्यास नक्की अधिक लाभ मिळतो तसेच शमन चिकित्सा म्हणजे पोटातून पाचन औषधे देणे त्यानंतर वमन करविणे आणि यानंतर व्याधीच्या स्वरूपानुसार औषधे सुरू ठेवणे असे केल्यास अत्यंत उपयुक्त फायदा हा आजार बरा करण्यासाठी आणि निरोगी व्यक्तीला त्याचे आरोग्य जतन करण्यासाठी होतो.
वमन चिकित्सा चालू असताना रुग्णाने नित्य व्यवहार (नोकरी / व्यवसाय) चालू ठेवावेत का?
वमन चिकित्सा घेत असताना म्हणजे जसे आपण पाहिले की पूर्वकर्म वर्णन केल्याप्रमाणे घृतपान चालू असताना नित्य व्यवहार चालू ठेवावेत. परंतु वमनाच्या दिवशी मात्र संपूर्ण दिवस आराम करण्यास सांगितले जाते. कारण वमन कर्मा नंतर थकवा जाणवत असल्याने त्या दिवशी (1 दिवस) मात्र आराम करणे गरजेचे असते.
Drug Induced vomiting हे अनैसर्गिक नाही का?
वमन ही प्रक्रिया नैसर्गिक रित्या प्राण्यामार्फत आपणास पाहायला मिळते जसे की, जर प्राणी आजारी असतील तर ते उलटी करतात आणि फक्त गवत खाऊन लंघन करतात.
आपल्या शरीरात अनेक प्रकारचे दोष हे नेहमी साठून राहतात त्यांना बाहेर काढण्यासाठी औषधे देऊन नंतर उलटी करविणे आणि शरीरातील संपूर्ण दोष बाहेर काढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे शरीर शुद्धीकरणाची.
आयुर्वेदनुसार छर्दि म्हणजे उलटी हा वेग अडवू नये असे वर्णन आहे उलटी होत असेल आणि ती रोखून धरल्यास इतर अनेक आजार उद्भवू शकतात असेही वर्णन आहे.
पूर्व कर्म ते प्रधान कर्म ह्यामधील कालावधी किती दिवसांचा असतो?
पूर्व कर्म म्हणजे घृतपान ते वमन करण्याचा दिवस याला रुग्ण प्रकृती आणि दोषानुसार साधारण ६-७ दिवस लागतात. प्रधान कर्म म्हणजे वमन करवून घेण्याची प्रक्रिया आणि वमन झाल्यानंतर होणारे कर्म म्हणजे पश्चात कर्म यालाच संसर्जन क्रम असेही म्हणतात. वमन प्रक्रिया योग्य झाल्यास शरीरातील अग्नि वाढविण्याकरिता संसर्जन क्रम पाळणे जरुरीचे असते.
एखाद्या व्यक्ती ची प्रकृती कफप्रधान असल्यास वमन करूनही कफदोष पुन्हा वाढू शकतात का?
- हो, वमन केल्यानंतर शरीरातील कफ दोष कमी होतो परंतु कफ दोष पुनः शरीरात वाढण्याची कारणे आहेत
- वमनानंतर संसर्जन क्रम पाळणे जरुरीचे असते ते न पाळल्यास पुनः कफ वाढू शकतो
- कफकर पदार्थाचे सेवन केल्यास शरीरात पुनः कफ वाढू शकतो.
- योग्य प्रकारे वमन झाल्यास आणि संसर्जन क्रम पाळल्यास आणि हितकर पदार्थ खाल्यास कफ वाढत नाही.
आजारानं होणारी उलटी व वमन उपचारांमुळे होणारी उलटी ह्यात काय फरक आहे?
- आजार उत्पन्न झाल्यानंतर ते शरीराला सहन न होणाऱ्या अश्या घटकाना बाहेर टाकते जी गोष्ट शरीरास अहितकारक किवा अजिबात सहन न होणारी असते ते शरीर उलटीद्वारे बाहेर टाकते. उलटी झाल्यानंतर शरीरास वेदना च जाणवतात. असे पहा की शरीर नको असलेले पदार्थ अति प्रमाणात झाल्यास कोणत्या न कोणत्या मार्गाने नेहमी शरीराबाहेर टाकण्याचे काम करते. जेणेकरून शरीरास ते बाधा करू शकणार नाही. फक्त इतकेच उलटी म्हणजे जेव्हा दोष अतिरिक्त प्रमाणाबाहेर वाढल्यास शरीराने दिलेली “उलटी” एक उत्तेजक प्रक्रिया आहे शरीरातील दोषाना काढण्यासाठी.
- या उलट वमन कर्मा मध्ये दोषाना चाळवून त्यांना शरीराबाहेर काढले जाते जेणेकरून ते शरीरास भविष्या मद्धे कोणताही अपाय होऊ देणार नाही
- वमन कर्मा करताना ते वैद्यांच्या देखरेखीखाली केले जाते त्यामुळे वमनाचा कोणताही परिणाम अथवा वमन करताना कोणताही त्रास जाणवत नाही. आणि माहत्वाचे म्हणजे वामनामुळे इतरही त्रास आणि आजार कमी होण्यास मदत होते.
वमन करण्यापूर्वी कोणती औषधे द्यावीत?
- कोणतेही पंचकर्म करण्यापूर्वी शरीराचे पचन करणे जरुरीचे असते त्याकरिता रुग्णास पाचन औषध देणे गरजेचे असते. पचन क्रिया व्यवस्थित असल्यास शरीर शुद्धी करणे अत्यंत सोपे होते आणि औषधे लवकर लागू पडतात. पचन करणे, अग्नि वाढविणे, पोट साफ करणे अशी औषधे व्याधी आणि दोषानुसार दिली जातात.
- निसर्ग नियमानुसार दोन वेळा जेवण आणि एकदा पोट साफ होणे हे महत्वाचे आहे त्यानुसार पचन क्रियेला फार महत्व आहे. आयुर्वेदात दशविध परीक्षा नुसार रुग्ण परीक्षण करता येते व यामध्ये मल, मूत्र, स्वेद, जिव्हा, दोष, प्रकृती यांचे परीक्षण करणे सांगितले आहे.
- पचन व्यवस्थित असल्यास दोषा नुसार केलेले कोणतेही पंचकर्म हे शरीरातील दोष बाहेर काढते आणि शुद्धीकरण करते.
एखाद्या रुग्णाची पंचांसंस्थेसंदर्भात अवयवाची शस्त्रक्रिया झाली असल्यास वमन करावे का?
वमन कर्मा दरम्यान दोष हे उलटी द्वारे बाहेर काढले जातात यावेळी वमनाचे वेग आल्याने छाती, पोट, व गळा या भागावर ताण येतो. म्हणून काही रुग्ण मध्ये जसे की, हृदरोग, घशाचे आजार, हर्निया, रक्तक्षय, appendix या सारख्या रोगामद्धे वमन टाळावे.
सध्या वेगाने आपल्याकडे कॅन्सर चे रुग्ण आढळत आहेत, कॅन्सर मध्ये कफदोष, रस धातू,व शुक्रधातू ची निर्मिती व स्थान ज्या अवयवात आहे अश्या फुफुस, स्तन, जिव्हा, मुख, पौरुषग्रंथी, स्त्री-बिजंड, गर्भाशय या कॅन्सरमध्ये वमनाचा फायदा दिसून येतो. पर्यायाने कॅन्सर चे पुनरुभवन टाळण्याचे काम पंचकर्मतील वमन आणि विरेचन करते.
ज्याप्रमाणे आपण आपली गाडी दर महिना ऑईलींग, servicing करतो त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतुनुसार आपण आपल्या शरीराची ही काळजी घेतली पाहिजे. जेणेकरून कोणत्याही हवामनाचा, आजारचा आपल्याला त्रास होणार नाही.
आजच आपल्या जवळच्या वैद्याना भेटा व आपल्या दोष आणि प्रकृतीनुसार वमन करून घ्या.
Written By…
Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. Contact today to book an appointment. |