दमा व कोजागिरी पौर्णिमा ह्यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे, व ह्या लेखात आपण आयुर्वेदाच्या सहाय्याने जाणून घेणार आहोत त्यामागचा शास्त्रीय दृष्टिकोन. आयुर्वेद शास्त्राच्या दृष्टीने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने औषध घेतल्यास दम्यावर उत्तम प्रकारे नियंत्रण ठेवता येते.

“दमवून सोडणारा दमा”

एकीकडे नेत्रसुखावह ठरणारा पावसाळा दुसरीकडे दमेकरी माणसाला शत्रू प्रमाणे ठरतो. 

कठीण परिस्थिती मधून सुटका झाल्यावर “सुटकेचा श्वास सोडला” अशी म्हण आहे. परंतु काही व्यक्ती हा अनुभव कधीही घेऊ शकत नाहीत कारण ते दम्याचे शिकार असतात. होय, हे खरे आहे, दम्याचे रुग्ण, सुटकेचा तर सोडाच परंतु कधीकधी सर्वसाधारण वाटणारा मोकळा श्वाससुद्धा घेऊ शकत नाहीत.

श्वसनक्रिया हि जन्म झाल्यापासून लगेच सुरु होते व अगदी मृत्यू येईपर्यंत चालू राहते, व त्यामुळेच श्वसनसंस्थेचा कुठलाही आजार रुग्णांना अगदी बेजार करून सोडतो. अत्यंत नैसर्गिक असणारी हि शारीरिक क्रिया,आपल्याला प्राणवायू पुरवते व फुफ्फुसांमध्ये रक्तशुद्धीकरण्याच्या कार्यास मोलाचा हातभार लावते.

दम्यावर उपचार न घेतल्यास मृत्यूसुद्धा ओढवू शकतो, त्यामुळेच योग्य माहितीच्या आधारे वेळीच आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास दम्यावर नियंत्रण ठेवता येते व रुग्ण निरोगी आयुष्य जगू शकतो. अत्यंत साधारण वाटणारा श्वासाचा आजार, हा अत्यंत गंभीर असा दम्याचा हल्ला  (Asthma Attack) होईपर्यंत वाट कधीही पाहू नये.

दमा हा श्वसननलिका व फुफ्फुसे ह्यांना होणारा आजार असून त्याविषयी अत्यंत मोलाचा असा आयुर्वेदिक दृष्टिकोन आज आपण ह्या लेखात जाणून घेणार आहोत. 

Table of Contents

आयुर्वेदानुसार दमा म्हणजे काय?

फुफुसामध्ये असलेला कफाचा ओलावा म्हणजे दमा.

आजाराच्या नावातच ‘दम लागणे’ किवा ‘धाप लागणे’ ही क्रिया असल्याने या आजाराची लागण झालेल्या रूग्णाला थोडेसे काम केल्यास ही दम लागतो.

आयुर्वेदामद्धे दमा म्हणजेच “श्वास” होय. हा आमशयाच्या (जठरच्या) विकारपासून उत्पन्न होतो, उरामध्ये राहून व्यान वायूची गती कफाने बंद झाली असता, कफ दुष्ट होऊन प्राणवह व अन्नउदक वह स्त्रोतासणा दुष्ट करून श्वास उत्पन्न करतो.

आयुर्वेदानुसार रक्ताच्या फेसापासून फुफुसची निर्मिती होते, यावरून रक्त धातू आणि फुफुसाचा फार निकटचा संबध आहे हे सिद्ध होते तसेच पित्तही शरीरात रक्तासह संपूर्ण शरीरात अव्याहतपणे वाहत असते यावरून पित्त व रक्त यांचा संबंध सिद्ध होतो. प्राण वायु, उदान वायु तसेच क्लेदक कफ व अवलंबक कफ यांचा प्रकोप झाल्याने श्वास (दमा) विकार उत्पन्न होतो.

श्वसन नलिकेवाटे शरीरात आलेला हवेतील ऑक्सीजन पेशींपर्यंत पोहोचवण्याचे कार्य फुफुसे करत असतात, मात्र दमा या आजारात श्वसनमार्गाला सूज आल्यामुळे ही वाहिनी आकुंचन पावते आणि ऑक्सीजन योग्य प्रमाणात फुफुसापर्यंत पोहोचण्यास आणि कार्बन डायऔक्साइड बाहेर पडण्यास अडथळा येतो. श्वसनमार्गात कफ चिकटून राहिल्यामुळे श्वासोच्छवास करण्यास अडथळा निर्माण होतो.

आमाशय (जठर) यावर काम करते म्हणूनवमन आणि विरेचन हे आयुर्वेदातील उपाय यावर अत्यंत लाभदायी ठरतात.

दमा कोणत्या वयात होण्याची शक्यता आहे?

दमा अगदी 6 महिन्याच्या बाळापासून ते 72 वर्षांच्या व्यक्तिला ही होऊ शकतो. वय वर्षे 2 च्या आतील लहान मुलांना होणारा दमा ओळखता येणे अतिशय कठीण असते.

लहान मुलांचा दमा बरा होतो का?

लहान वय कफचे असून अग्नी मंद असल्याने कफ साठत राहतो. Adenoids नावाच्या गाठी लहान मुलांमध्ये असतात त्या वयानुसार आपोआप कमी होतात. लेहण विधि सुवर्णप्राशन सारखे , बालसंस्कार आयुर्वेदातील करावे कडू तुरट आणि तिखट खाण्यामध्ये  ठेवावे.

दमा होण्याची कारणे कोणती?

दमा होण्याची अनेक कारणे आयुर्वेदामद्धे वर्णीत आहेत.

  • स्थूलपणामुळे
  • एलर्जी, सिगरेट चा धूर, पाळीव प्राणी किवा पक्षी यांचे केस अथवा पिसे, हवेतील परागकण
  • अति व्यायाम किवा अति परिश्रम
  • धूर, धूळ, प्रदूषण
  • मानसिक ताण- तणाव
  • हृदया संबंधित आजारात
  • मूळव्याधीचा परिणाम म्हणून
  • यकृता संबंधित आजारात
  • अंनुवंशिक आई, वडील, आजोबा कोणाला असल्यास
  • लहानपणी खूप चिकट, जड अन्नपदार्थ, विरुद्धन्न खाल्याने जसे की (शिकरण, फ्रूट सॅलड)
  • सतत होणारी सर्दी चा त्रास
  • पांडुरोग (anemia)
  • थंड पदार्थांचे सेवन, थंड वातावरण
  • ताप,उलटी व आमतीसारामुळे
  • विषामुळे उत्पन्न

गरोदर स्त्रीला दमा असल्यास बाळाला होतो का?

गरोदर स्त्रीने गर्भारपणात अतिशय थंड पदार्थ , आंबट पदार्थाचे सेवन अथवा विहर केल्यास किवा सतत सरडीचा त्रास असल्यास होणार्‍या बाळाला दमा होऊ शकतो याकरिता आयुर्वेदातील गर्भारपणतील मासानुमासिक औषधे आई ने वैद्यांच्या  सल्ल्याने नक्की घ्यावीत.

आयुर्वेदिक वैद्य दम्याचे निदान कसे करतात?

रुग्णाची मूळ प्रकृती, दोष, जिव्हा, नाडी, शब्द, स्पर्श, प्रश्न परीक्षा अशा परीक्षांच्या आधारे ही रुग्णाचे व्याधी निदान केले जाते.

नाडी परीक्षेवरून वैद्य दोषाची तपासणी करून म्हणजे वात,पित्त व कफाची गती, त्याचे प्रकार, दोषची गती, सामता निरामता याचे निदान करून दम्याचे  चे निदान करतात.

दम्याची लक्षणे कोणती

  • सर्दी होणे
  • ताप किवा कणकण जाणवणे
  • कोरडा खोकला किवा कफासह खोकला
  • खोकल्यानंतर बेडके पडणे
  • श्वास घेताना छातीमध्ये घरघर ऐकू येणे
  • श्वास घेताना अडथळा होणे.
  • श्वास (धाप) लागणे

केवळ नाडीपरीक्षा करून दमा ओळखता येतो का?

आयुर्वेदानुसार नाडीपरीक्षा ही अत्यंत महत्वाची परीक्षा पद्धती आहे. रुग्णाची मूळ प्रकृती,दोष, जिव्हा, शब्द, स्पर्श, प्रश्न परीक्षा अशा परीक्षांच्या आधारे ही रुग्णाचे व्याधी निदान केले जाते.

नाडी परीक्षेवरून वैद्य दोषाची तपासणी करून म्हणजे वात,पित्त व कफाची गती, त्याचे प्रकार, दोषची गती, सामता निरामता याचे निदान करून दम्याचे चे निदान करतात.

रुग्णाची लक्षणे, पूर्व व्याधी वृतांत, अंनुवंशिक व्याधी यानुसार मूळ व्याधी व त्याचे निदान करण्यास वैद्य एक न अनेक प्रश्न रुग्णांना विचारतात.

आयुर्वेदानुसार व्याधीची चिकित्सा करण्यासाठी रोगाचे मूळ शोधून त्यावर चिकित्सा करणे महत्वाचे ठरते.

नाडी परीक्षेद्वारे वैद्य फक्त व्याधी चेच नव्हे  तर पुर्वव्याधी , लक्षणे व पुढे होणारे व्याधी, त्यावरील चिकित्सा याचेही निदान करतात व व्याधीला मूळापासून हटविण्याचे काम करतात.

दम्याचे निदान करण्यासाठी काही रक्त तपासण्या (Pathology Tests) आहेत का?

सर्वसाधारणपणे ‘स्पायरोमेट्रि’ ही तपासणी केली जाते पण यामध्ये डॉक्टर सांगतील तसे दीर्घ श्वास घेणे, ठराविक सेकंदमध्ये तो सोडणे असे करावे लागते. लहान मुलांमध्ये ही चाचणी करणे अवघड जाते.

‘इम्पल्स औसिलोमेट्रि’ ही दुसर्‍या प्रकारची चाचणीदेखील लहान मुलांमध्ये करता येते.

Blood eosinophil count, serum IgE या रक्ताच्या तपासण्या महत्वाच्या ठरतात.

Lung function test ही चाचणी केल्यास फुफुसांमध्ये obstruction असल्यास समजते.

छातीचा X-Ray काढल्यावर दम्याचे निदान होऊ शकते का?

रुग्णांमद्धे छातीच्या x-ray (क्ष-किरण) केल्यास bronchitis पासून ते बोन फ्रॅक्चर असल्यास निदान करण्याकरिता मदतीचे ठरते.

CT (HRCT) म्हणजे computed टोमोग्राफी या हाय रेजोल्यूशन तपासणी मध्ये फुफुसांचे व्याधी चे निदान सुलभतेने करता येते.

Stethoscope ने छाती तपासून दमा ओळखता येतो का?

दम्याच्या च्या रुग्णांमद्धे श्वसन नलिका ह्या अरुंद असतात व त्यावर एक प्रकारची सूज आलेली असते यामुळे रुग्णांना श्वास घेताना प्रचंड त्रास होतो, अशा वेळी रुग्ण श्वास घेताना वेगवेगळ्या प्रकारचे श्वासाचे आवाज स्टेथोस्कोप च्या मदतीने ऐकलं मिळतात.

दमा व दम्याचा हल्ला (Asthma Attack) ह्यात काय फरक आहे?

श्वासाच्या (दम्याच्या) आयुर्वेदानुसार काही अवस्था सांगितल्या आहेत.

कोणत्याही कारणानी अथवा प्रकारानी दम लागत असल्यास त्याच्या प्रत्यक्ष दम लागण्याची अवस्था (वेगावस्था) व दम लागलेला नसतांनाची अवस्था (अवेगावस्था).

  • वेगावस्था : या अवस्थेत मनुष्य फार तडफडतो. छातीमध्ये घू घू असा आवाज करत धाप सुरू होते, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो फार कष्टाने श्वास घ्यावा लागतो. पुरेसा श्वास न घेतल्याने घुसमटल्याप्रमाणे वाटते. झोपल्यावर श्वास घेण्यास फार कष्ट होतात व बसल्यास बरे वाटते. कपाळ, छाती, गळ्यावर घाम येऊ लागतो, खोकल्याची उबळ सुरू होते, बोलतानाही सतत खोकल्याची ढास लागते. तोंडाला   कोरड पडते, वारंवार दम लागतो. उरात व बरगडयात वेदना सुरू होतात. चक्कर, तोंडाला चव नसणे आणि तहान अशी लक्षणेही दिसतात.
  • अवेगावस्था : वेगावस्थेत धापेचा त्रास झाल्यानंतर पोटाचे, मानेचे स्नायू दुखणे,थकवा, बेडका पडणे, थोड्या कष्टाने देखील थकल्यासारखे होणे, याच्या जोडीला सर्दी आणि खोकला जाणवतो. गरम पदार्थाची इच्छा होते.

दम्याचे काही प्रकार असतात का?

आयुर्वेदानुसार दम्याचे ५ प्रकार वर्णन केले आहेत.

  1. क्षुद्र : श्रम व अतिशय भोजन केल्याने वाढलेला वात क्षुद्र श्वास उत्पन्न करतो, जो आपोआप कमी होतो.
  2. तमक : सतमक व प्रतमक असे याचे प्रकार आहेत. ढग आले असताना, पाऊस पडत असताना, कफकरक पदार्थ खल्याने, पूर्वेकडील वार्‍याने, श्वास वाढतो यास “तमक श्वास” म्हणतात. यामध्ये झोपल्यावर श्वास घेण्यास फार कष्ट होतात व बसल्यास बरे वाटते. कपाळ, छाती, गळ्यावर घाम येऊ लागतो, खोकल्याची उबळ सुरू होते, बोलतानाही सतत खोकल्याची ढास लागते. तोंडाला कोरड पडते, वारंवार दम लागतो. उरात व बरगडयात वेदना सुरू होतात. चक्कर, तोंडाला चव नसणे आणि तहान अशी लक्षणेही दिसतात. प्रतमक श्वासात ताप आणि चक्कर अशी दोन लक्षणे जाणवतात, थंड पदार्थांनी श्वास कमी होतो.
  3. छिन्न : छिन्न श्वासात मनुष्य तुटक तुटक श्वास घेतो, सर्वांगात अतिशय वेदना होतात, घाम येतो, चक्कर येते, पोट फुगते, मूत्र बंद होते, क्वचित मनुष्य बेशुद्धा होतो, तोंडस कोरड पडते, डोळे लाल होतात, बडबडतो व नीचेष्ट पडून राहतो.
  4. महान : महाश्वासात मनुष्य दीन होतो, श्वासाचा आवाज फार मोठयाने येतो, रोगी कण्हतो , उन्मत्त बैलाप्रमाणे अतिशय कापत असतो, छातीत धडधडते, बोलताना अडखळतो, वारंवार बेशुद्ध होतो, डोळे, कान व डोके यात वेदना होतात.
  5. ऊर्ध्व : दीर्घ व मोठेमोठे श्वास बाहेर टाकतो परंतु श्वास आत घेत नाही, स्त्रोतसाची मुखे कफाने बंद होतात, बोलण्यासही त्रास जाणवतो, डोळे सतत फिरवत राहतो.

दम्याचा हल्ला किती काळ टिकतो?

दम्याचा अटॅक हा साधारणता १५ – ३० मिनिटे असू शकतो यावेळी अगदी बारकाईने रुग्णास हाताळावे.

नोकरी अथवा व्यवसायाच्या ठिकाणी दम्याचा हल्ला (Asthma Attack) झाल्यास काय करावे?

  1. सर्व प्रथम रूग्णाला आराम अवस्थेत पाठ टेकून बसवावे.
  2. नतर मोठे खोल श्वास घेण्यास सांगावे आणि जास्तीत जास्त नैसर्गिक हवा त्या जागेत येण्यासाठी दारे खिडक्या उघडावी
  3. ½ कुप कोमट पाणी प्यावे आणि शांत बसावे.
  4. शक्य झाल्यास तुळस अथवा दालचिनीचा तुकडा जिभेवर ठेवावा.
  5. श्वास घेण्यास अतिशय त्रास होत असल्यास जवळच्या वैद्यांना दाखवावे.

दम्याचे रुग्ण औषधाचा पंप (Inhaler) का वापरतात?

इनहेलर, अस्थालीन यासारखी औषधे श्वासनलिका चटकन उघडण्याचे काम करतात आणि स्वस्त असल्यामुळे या औषधांचा अतिवापर केला जातो. पण सर्वात महत्वाची गोष्टा म्हणजे श्वसन नलिकाना प्रत्येक आकुंचंनंनंतर एक विशिष्ट आळर्गिक सूज येते आणि कलमनने ही सूज वाढत जाते. व इनहेलर, स्टेरोइड सारख्या औषधांनी तात्पुरते बरे वाटते.

घरात एखाद्या व्यक्तीस दमा असल्यास, बाकीच्यांना तो होऊ शकतो का?

दमा होण्याचे एक कारण आनुवंशिकता हे असून घरात एखाद्या व्यक्तिला दमा असल्यास पुढील पिढीतील मुलांना दमा होण्याची आनुवंशिकता असतेच याचकरिता आयुर्वेदातील रसयन औषधे आणि पंचकर्म चिकित्सा अतिशय उपयुक्त ठरते.

दमा बरा होत नाही व फक्त नियंत्रणात ठेवता येतो, हे खरे आहे का?

दमा हा आयुर्वेदानुसार “याप्य” म्हणजे तात्पुरता काळापुरत्या बरा होणारा आहे. म्हणजेच व्यवस्थित रित्या औषधे व विशिष्ट पथ्ये सांभाळली असता तो आटोक्यात राहण्यासारखा आहे.

आयुर्वेदानुसार पथ्याला फार महत्व आहे कोणत्याही रोगाचे निदान झाल्यावर वैद्यांच्या देखरेखीखाली प्रकृतिनुसार पथ्ये, औषधे व पंचकर्मे केल्यास एकदा बरा झालेला दम्याचा आजार पुन्हा उद्भवत नाही असेही रुग्ण आहेत.

दम्याच्या रुग्णाने कोणती काळजी घ्यावी?

दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा?

  1. नेहमी गरम पाणी पिण्यामध्ये ठेवावे.
  2. ताजे, हलके आणि सात्विक अन्न खावे.
  3. संध्याकाळी दही व दुधाचे पदार्थ खाऊ नयेत
  4. बाहेरचे अन्न, शिळे अन्न, आंबवलेले  पदार्थ खाऊ नयेत.
  5. तुलसी चा चहा, आल्याचा काढा, मध, दालचीनी, लवंग यासारखी द्रव्ये नेहमी खाण्यात असावीत.
  6. आपली दिनचर्या नियमित असावी.
  7. संध्याकाळचे जेवण अगदी हलके असावे किवा काहीही खाऊ नये.
  8. प्राणायाम , योगासने, चालणे असे व्यायाम दररोज कमीत कमी 30 मिनिटे करावे.
  9. गरम पाण्यात हळद अथवा मीठ घालून गुळण्या करणे.
  10. सकाळ संध्याकाळ गरम पाण्याची वाफ घेणे.
  11. नाकामद्धे औषद्धिसिद्धा तूप अथवा तेल घालणे

दैनंदिन जीवनात कोणत्या गोष्टी टाळाव्यात?

  1. दमेकरी व्यक्तीने पावसात भिजणे टाळावे तसेच थंड व धूळ असलेल्या जागी जाणे टाळावे.
  2. अतिशय थंड आणि ढगाळ वातावरणात दमा अधिक वाढतो याकरिता या काळामध्ये अतिशय काळजी घ्यावी.
  3. घरातून बाहेर निघण्यापूर्वी मास्क वापरावा.
  4. कीटकनाशक, स्प्रे, पेंट, अगरबत्ती, मच्छर चे कोइल, सुंगधी अत्तर यांची एलर्जि असल्यास यापासून काळजी घ्यावी.
  5. धूम्रपान करणार्‍या व्यक्तींपासून लांब राहावे.
  6. याव्यतिरिक्त आहार व आपल्या जीवनशैली मध्ये बदल करावेत.
  7. पाळीव प्राणी व त्यांचे केस यापासून लांब राहावे.

कोणत्या प्रकारचे अन्न घ्यावे व टाळावे?

  1. “लंघनम परम औषधंम” या व्याख्येप्रमाणे पथ्य या संकल्पनेमध्ये उपवास म्हणजे अगदी हलका व माफक आहार महत्वाचा ठरतो. यासोबतच विहार म्हणजे विशिष्ट शरीर क्रियाकर्मे करणे व काय करू नये या गोष्टीही येतात. याचे काटेकोर पालन केल्यास दमा आटोक्यात ठेवता येतो.
  2. एक भुकटा राहणे म्हणजे फक्त एक वेळचे जेवण हे दमेकरी व्यक्तीकरिता खूप उपयोगी ठरते. जसे की दुपारी आहारामद्धे नेहमीप्रमाणे ठेवून संध्याकाळी मात्र फक्त भाजका पदार्थ खावा.
  3. गहू, जुने तांदूळ, मूग, हुलगे, जव, पटोल यांचे सेवन करावे.
  4. पालक, गाजर, तांदुळजा, तांबडा मठ, राजगिरा या भाज्यांचे सेवन करावे.
  5. लसूण, आले, हळद, मध नेहमी खाण्यात असावे.
  6. नेहमी कोमट पाण्याचे सेवन करावे.
  7. नेहमी गरम व सात्विक अन्नाचे सेवन करावे
  8. आंबट फळे, अंबवलेले पदार्थ, फ्रीज मधील पदार्थ, शिले अन्न दही, ताक अशा पदार्थाचे सेवन टाळावे.

योगासने व व्यायाम ह्यांचे महत्व किती आहे?

शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढविण्याचे काम योगासने व्यायाम आणि प्राणयाम मध्ये आहे.

दमा व्याधी मध्ये शरीराची रोग प्रतिकार क्षमता व फुफुसाचे बळ अगदी कमी होताना दिसून येते. अशा वेळी योगासने आणि प्राणयाम ने खूप चांगला परिणाम दिसून येतो.

प्राणायाम मुळे शरीरातील प्रत्येक पेशी मध्ये विस्फरण होऊन त्याला बळ मिळते. श्वसनाची क्रिया सुधारते. शरीरातील ऑक्सीजन च पुरवठा वाढतो.

मानसिक अवस्था व दमा ह्यांचा संबंध आहे का?

मानसिक स्ट्रैस, टेंशन असताना दम्याच्या अवस्थेत वाढ होताना दिसून येते. ह्याचे  कारण जेव्हा कोणत्याही प्रकारचा मानसिक ताण आढळून येतो तेव्हा शरीराच्या रोगप्रतिकार शक्तिवर परिणाम होताना दिसून येतो व शरीरातून अनेक प्रकारच्या हॉर्मोन्स चे स्त्रावण होते याचा परिणाम फुफुसांवर होऊन फुफुसांच्या अंतत्वचेला सूज येऊन दमा वाढू लागतो.

आयुर्वेदानुसार दम्यासाठी कोणते पंचकर्म उपचार प्रभावी आहेत?

पंचकर्म ही एक अशी उपचार पद्धती आहे ज्यामधे, रोगाला मूळापासून दूर करण्याचे काम केले जाते.

झाडाचे मूळच खराब झाले तर झाडाच्या फांद्या खुडुन काहीही उपयोग होत नाही त्याचप्रमाणे मुळापासून रोगाला नाहीसे करण्यासाठी पंचकर्म चिकित्सा खूप लाभदायी ठरते.

दम्याच्या रुग्णांमद्धे स्ंनेहन, स्वेदन, बस्ती, वमन, विरेचन नस्य यांचा उपयोग अतिशय उपयुक्त ठरतो.
स्ंनेहन : औषधीयुक्त तेल छातीला व पाठीला अथवा सर्वांगला लावणे. यामुळे वटची गती नियमित होऊन स्त्रोतसाणा अर्दवता येऊन कफ सुटण्यास मदत होते.

याकरिता तिळाचे तेल, माष किवा महामाष तेल, लवणयुक्त तिल तेल, मोहरीचे तेल, नारायणी तेल अशी सिद्ध तेले वापरली जातात.

स्वेदन : छाती व पाठीला औषधी औषधी काढयच्या वाफेणे शेकले जाते ज्यामुळे छातीतील कफ विलयीभूत होऊन पातळ होतो व सहजरीत्या बाहेर पडतो. यामुळे छाती मोकळी होऊन रुग्णास आराम मिळतो. स्वेदनापूर्वी स्ंनेहन करणे महत्वाचे ठरते.

वमन : शरीरातील विकृत कफ बाहेर टाकण्यासाठी वमन कर्म केले जाते. यामध्ये छातीतील कफ व जास्त कफाचे बेडके पडणार्‍या रुग्णांना औषधीयुक्ता काढे, तूप दिल्यानंतर उलटीद्वारे संपूर्ण कफ बाहेर टाकला जातो. वमनामद्धे औषधी सिद्धा तूप अथवा तेले योग्य काळासाठी पोटामद्धे स्ंनेहंनसाठी दिली जातात नंतर बाहयता अंगाला तेल लावून स्वेदन दिले जाते जेणेकरून सर्व दोष पोटात येण्यास मदत होते यानंतर वामिक औषधे व काढयाद्वारे वमन केले जाते. वसंत ऋतूमध्ये हा उपक्रम केला जातो. यामुळे शरीरातील अतिरिक्ता कफ बाहेर पडण्यास मदत होते. दमा रोगावरील रुग्णांनुसार वैद्यांच्या देखरेखीखाली हे पंचकर्म केले जाते.

नस्य : सर्दीचा त्रास सुरू होऊन नंतर दम्यचा त्रास सुरू होणार्‍या रुग्णांना नाकाच्या आतल्या त्वचेची प्रतिकार शक्ति वाढविणारी औषधे नाकामद्धे सोडली जातात. श्वासोछ्वास व्यवस्थित रित्या होतो.

विरेचन : यामध्ये जुलाब होण्यासाठी औषधी देऊन खालच्या मार्गाने विकृत कफ व पित्ताला बाहेर काढण्याचे काम विरेचनाने होते. अम्लपित्तासह दमा असणार्‍या रुग्णांना याने फायदा होतो.

बस्ती : हा वात कमी करण्यासाठीचा महत्वाचा उपाय. वाताज प्रकृती आणि शुष्का खोकल्यामद्धे औषधी सिद्धा तेलाचे बस्ती खूप लाभदायक ठरतात.

दम्यावर उपचार न केल्यास काय होते?

दम्यावर उपचार न केल्यास याचा परिणाम म्हणून फुफुसावर परिणाम होऊन याचा परिणाम संपूर्ण शरीरावर होताना दिसून येतो परिणामी शरीरातील रक्तावर आणि त्वचेवर याचा परिणाम दिसून येतो.

कोजागिरी पौर्णिमा व दमा ह्यांचा निकटचा संबंध कसा?

आयुर्वेदानुसार रक्ताच्या फेसापासून फुफुसाची निर्मिती होते, यावरून रक्त धातू आणि फुफुसाचा फार निकटचा संबध आहे हे सिद्धा होते तसेच पित्तही शरीरात रकतासह संपूर्ण शरीरात अव्याहतपणे वाहत असते यावरून पित्त व रक्त यांचा संबंध सिद्ध होतो. पावसाळी  वातावरणामध्ये काही काळ उष्णता जाणवू लागते याला आपण ऑक्टोबर हीट म्हणून ओळखतो, तो शरद ऋतु होय. या महिन्यातील पौर्णिमेला आपण कोजागिरी पौर्णिमा म्हणतो.

शरद पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशछायेत गच्चीवर किवा अंगणात मजेशीर गप्पा मारत शिजवलेली खीर किवा आटवलेले दूध यांचा आनंद लुटला जातो पण ही मजेसाठी नसून यामागे शास्त्रीय कारण आहे

शरद ऋतुतील प्रखर उष्णतेने उष्ण,तीक्ष्ण गुण वाढून पित्त वाढून रक्तधातूही बिघडायला लागते कालांतराने याचा परिणाम फुफुसवरही दिसून येतो. फुफ्संची कार्यक्षमता कमी होऊन उत्तरोत्तर कमी होऊन दमा सारखा आजार उत्पन्न करतात यालाच आधुनिक शास्त्रामध्ये ‘ब्रोंकीअल अस्थमा म्हणतात. पौर्णिमेला चंद्राच्या शीतल प्रकाशात विशिष्ट चुंबकीय शक्ति पृथ्वीवर वाहत असते, असे संशोधंन अंती आढळून आले आहे.

आणि म्हणूनच आयुर्वेदिक औषधी पद्धतीने बनवलेली खीर / दूध (रुग्णाच्या प्रकृती व आजारानुसार वापरली गेलेली औषधी) पथ्ये पाळून सेवन केली तर पित्ताचे व उष्णतेचे व श्वसनासंबंधी चे सर्व आजारावर ताबा मिळवता येतो. अशा पद्धतीने सर्व पथ्ये पालन करून औषधी सेवन केल्यास पित्त शरीरावाटे बाहेर पडून आपोआप विरेचन घडते, यामुळे शरीर क्षुधा होते, उष्णतेचे विकार कमी होतात, अम्लपित्त, अंग खाजविणे, केस गळणे, डोळ्यांची जळजळ, तळहात पायाची जळजळ कमी होऊ लागते. अर्थातच याच्या जोडीला नियमित औषधोपचार , पथ्यपालन, ऋतुनुसार पंचकर्म आणि योग प्राणयाम यांची साथ मिळाली तर दुग्ध शर्करा योगच |

 

Written By…

Dr. Pallavi Shinde is the director at Shree Vishwamukta Yog, Ayurved and Panchakarma Clinic at Pune, India. She always uses ayurvedic proprietary formulations for many chronic health diseases & many products for Skin Diseases & beauty products. She is a hardcore Researcher, Practitioner, Promoter of Ayurveda. 

Contact today to book an appointment.

दमा व कोजागिरी पौर्णिमा – जाणून घ्या ह्यांचा निकटचा संबंध, आयुर्वेदाच्या आधारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *